उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांसमोर राज ठाकरेंच्या ‘मविआ’ तील एन्ट्रीसाठी शब्द टाकला…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर आता तिथे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी सोमवारी (ता.8) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मातोश्री’वर आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीसाठी शब्द टाकल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. या दोन्ही पदांसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेंच सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसनं विधान परिषदेसाठी तर विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आग्रही दावा करण्यात आला आहे.
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली. यावेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाविकास आघाडीतील संभाव्य एन्ट्रीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पण महाविकास आघाडीतील राज ठाकरे यांच्या एन्ट्री संदर्भात राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहे. दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यानंतरच राज्यातील काँग्रेस नेते राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भातही उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील काँग्रेसचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात आधी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
सध्या विधान परिषदेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस पक्षानं दावा ठोकला आहे. यात विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा, काँग्रेस पक्षाचे आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार आहेत.
काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडेच असावं यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
आता येत्या काळात लवकरच विधानपरिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. या पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नाव आघाडीवर आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसने दावा केला असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात सतेज पाटलांच्या निवडीने लवकरच काँग्रेसला लाल दिवा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
