भाजपने मारले एका दगडात अनेक पक्षी !
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.
त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयात सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोधाची भूमिका घेतली. याबाबत ते अद्यापही ठाम आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना मराठा आणि ओबीसी यांचे आरक्षणाचे ताट स्वतंत्रच असले पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या मान्य केल्या. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. संदर्भात घेतलेल्या निर्णय कायद्याला धरून नाही, असा आक्षेप प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही राजकीय भूमिकेतून टीका आणि समर्थन करीत आहेत. मात्र हा विषय राजकीय कमी आणि सामाजिक अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेताना सामाजिक समतोल व न्याय विचारात घ्यायला हवा होता.
मराठा आरक्षण आंदोलनातील हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नुसार कुणबी जातीचे दाखले देण्याचे काम देखील सुरू झाले आहे. या विरोधात प्रचंड रोष आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.
राज्य शासनाच्या या निर्णयाला आपल्या ठाम विरोध असल्याचे ॲड आंबेडकर म्हणाले. सरकारमध्ये सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांना गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावायचे आहे. त्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी पडद्यामागून सूत्र हलवली.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये निजामी वृत्ती आहे. या निजामी वृत्तीचे आमदार आणि खासदार समाजात भांडण लावण्याची कोणतीही संधी सोडत नाही. या निर्णयानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे भाजपने या निर्णयाच्या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.
