पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी.
पालघर:- पालघर जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर, विशेषतः बोईसर–पालघर मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत, अवैज्ञानिक व रस्ता मानकांनुसार नसलेले गतिरोधक उभारण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. विद्युत प्रकाश मोरे यांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर तक्रार सादर केली आहे.
भारतीय रस्ते परिषदेच्या (इंडियन रोड्स काँग्रेस) मार्गदर्शक तत्त्वांनुसार गतिरोधकांची कमाल उंची दहा सेंटीमीटर इतकी असावी तसेच तो रस्त्याच्या संपूर्ण रुंदी३.७ मीटर इतका असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आढळणारे गतिरोधक हे अत्यंत उंच, अरुंद, अचानक उताराचे असून त्याठिकाणी आवश्यक सूचना फलक व परावर्तक रंग वापरण्यात आलेले नाहीत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहनांचे नुकसान तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, केवल सेमलानी विरुद्ध मुंबई महानगरपालिका आयुक्त व इतर या प्रकरणात (दि. २७ एप्रिल २००५) मा. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, सर्व गतिरोधक हे भारतीय रस्ते परिषदेच्या मानकांनुसारच असावेत, मानकांनुसार नसलेले व अनधिकृत गतिरोधक तात्काळ हटवावेत तसेच नवीन गतिरोधक केवळ अधिकृत परवानगीने व नियमांनुसारच उभारावेत. असे असतानाही पालघर जिल्ह्यात या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. मोरे यांनी पालघर जिल्ह्यातील, विशेषतः बोईसर–पालघर रस्त्यावरील सर्व गतिरोधकांची तात्काळ तपासणी करून रस्ता मानकांनुसार नसलेले गतिरोधक काढून टाकावेत, आवश्यक ठिकाणी नियमांनुसारच नव्याने गतिरोधक उभारावेत तसेच योग्य सूचना फलक व परावर्तक चिन्हे लावावीत, अशी मागणी केली आहे. ही सर्व कार्यवाही तीन महिन्यांच्या आत पूर्ण न झाल्यास कायद्यानुसार योग्य ती पावले उचलण्यात येतील, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
नियमबाह्य गतिरोधक बाबत ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली असून, त्यावर स्थळपाहणी करण्यात येणारआहे.भारतीय रस्ते परिषदेच्या मार्गदर्शक मानकांनुसारच गतिरोधकांची पाहणी करून ज्या ठिकाणी नियमबाह्य गतिरोधक आढळतील,ते नियमानुसार दुरुस्त करण्यात येतील.
अजय जाधव
उपविभागीय अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
