दै. चालु वार्ता पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
छ. संभाजीनगर (पैठण): शहरात गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक पद्धतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येत्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती समितीची महत्त्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संपन्न झाली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही बैठक माजी अध्यक्ष बाळासाहेब पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत नव्याने समितीची रचना करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी गौरव खिरे तर उपाध्यक्षपदी नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली. कृष्णा मोरे यांच्या निवडीची घोषणा होताच उपस्थित शिवभक्तांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष करत त्यांचे स्वागत केले व शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना कृष्णा मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातीचे आराध्य दैवत असून त्यांची जयंती सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन साजरी होणे गरजेचे आहे. सर्व समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबवून यंदाची शिवजयंती भव्य व दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येईल. या बैठकीस माजी कार्याध्यक्ष अनिल राऊत, किशोर सदावर्ते, महेश पवार, शिवराज पारीख, किरण जाधव, सुभाष नवथर, ज्ञानेश्वर वाघे, अस्लम पठाण यांच्यासह अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
