अशोक खरात प्रकरणावरून राऊत काय म्हणाले?
सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशामध्ये, रोज नवनवीन खुलासे या प्रकरणात होत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
याच प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. “आसाराम बापूंनादेखील नरेंद्र मोदी भेटत होते, म्हणून सरकार कोसळले का?” असे म्हणत पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
जळगावात पत्रकारांशी संवाद साधत असताना अशोक खरातला कोण कोण भेटले? याबाबत नावे पुढे येत आहेत. त्यामुळे हे सरकार कोसळेल असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “आसाराम बापूंनासुद्धा मोदी भेटत होते, म्हणून मोदींचे सरकार कोसळले का? फक्त मोदीच नव्हे तर लालकृष्ण अडवाणी, अमित शहाही भेटत होते. संपूर्ण भाजपचे ते जगतगुरु होते. तोच जर न्याय इथे लावला, तर तुम्ही काय करणार आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आज आसाराम बापू मुक्त आहेत. नरेंद्र मोदी हे राम रहीमचेही भक्तच होते. त्याच्या आश्रमात तर शोषण, हत्या, खंडण्या हे सर्व सुरूच होते. पण आतापर्यंत तो 27 वेळा पॅरोल दिला आणि निवडणुकीसाठी त्याला बाहेर आणले. अशा मानसिकतेचे सरकार जर देशांमध्ये आणि राज्यामध्ये असेल तर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात?” असे सवाल करत भाजप आणि केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
पोटनिवडणूक लढवणार का? संजय राऊत म्हणाले…
काँग्रेस पक्ष हा राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक पुढे जाणार आहोत. राहुरीच्या जागेवर राष्ट्रवादीचा अधिकार आहे. पण सर्व गोष्टींची चर्चा होईल. ज्याची ताकद असेल ते लढवतील. एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढवणार नाही. पण राहुरीमधून आम्ही लढावे अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण तरीही भाजपाला फायदा होईल अशी भूमिका घ्यायची नाही, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
