जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व चारही पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. समाजकल्याण सभापतिपदी जितेंद्र बडेकर, महिला व बालकल्याण सभापतिपदी अंकिता पाटील, तर उर्वरित दोन सभापती म्हणून दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांची निवड करण्यात आली.
तब्बल चार वर्षांनंतर या पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांनी विराजमान होताच जिल्हा परिषदेत राजकीय समन्वयाचे चित्र पाहायला मिळाले.
सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दुपारी एक वाजेपर्यंत सत्ताधारी राष्ट्रवादीकडून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर विरोधी पक्षाने सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. परिणामी, चारही जागांसाठी चारच उमेदवार रिंगणात राहिले. सर्वसाधारण सभेत चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आल्यानंतर पीठासीन अधिकारी यशवंत माने यांनी चौघांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, श्रीकांत खरात आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ‘फक्त निवडणुकीपुरता समन्वय नको, तर जिल्हा परिषदेला महाराष्ट्रात ‘ब्रँड’ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,’ असे मत उद्धवसेना गटनेते विजयसिंह शिंदे यांनी व्यक्त केले. ‘विरोधी पक्षात असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सभागृहात हलक्या फुलक्या शैलीत भाष्य करत वातावरण प्रसन्न केले. ‘जिल्हा परिषद ही आमदार घडवणारी शाळा आहे,’ असे म्हणत त्यांनी सदस्यांना प्रोत्साहित केले. त्यावर सभागृहात हशा पिकला. पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन विकासकामांना गती दिली जाईल, तसेच कामकाजाची पद्धत, प्रस्ताव सादरीकरण याबाबत पदाधिकाऱ्यांना ‘यशदा’मध्ये प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच, बिनविरोध निवडीमुळे जिल्हा परिषदेत समन्वयाचे राजकारण बळकट होत असल्याचे चित्र असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
