दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
परभणी : येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वामनराव कराळे यांची पुणे येथून प्रसिद्ध होणा-या “चालू वार्ता” या राज्यस्तरीय दैनिकामध्ये ‘परभणी जिल्हा उप संपादक पदी नियुक्ती’ करण्यात आली आहे.
मागील २९ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले दत्तात्रय कराळे यांना २००१८ मध्ये “छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय समता पुरस्काराने” मुंबई येथे सन्मानित करण्यात आले आहे. गेली बावन्न वर्षे अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत मुंबईत वास्तव्य केलेल्या श्री. कराळे यांनी मुंबईत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि राजकीय पक्षांतर्फे त्यांना “उत्कृष्ट पत्रकार” म्हणून गौरविले आहे त्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत वर्ल्ड फेम वसई तालुका कला-क्रीडा मंडळ, यांचे तर्फे पुरस्कार, विरार येथील नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आमदार क्षितीज ठाकूर चषक दही हंडी पुरस्कार, विरार महापालिकेतील शिवसेना नगरसेवक तथा पालघर जिल्हा शिवसेना अध्यक्ष शिरीष चव्हाण यांच्या वतीने चषक व पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे समाज मित्र पुरस्कार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कदम यांच्या तर्फे समाज रत्न पुरस्कार, कॉंग्रेसतर्फे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती पुरस्कार, मुस्लीम समाज नेते तथा तत्कालीन उपमहापौर सगीरभाई डांगे आणि ॲड. खलील चिंदे यांच्या शैक्षणिक संस्थांतर्फे हिंदु-मुस्लीम समाज ऐक्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सामाजिक कार्याचा वसा घेतलेले दत्तात्रय कराळे यांनी पत्रकारितेबरोबरच अनेक लोकहितवादी व जनकल्याण संस्थांच्या माध्यमातून लोकोपयोगी सेवेबरोबरच अनेक गोर, गरीब, वंचित व पिडीतांना न्याय मिळवून देण्यासंबंधीची महत्प्रयासी कामे केली आहेत. ज्यामध्ये पालघर जिल्हा संपादक संस्था, वामन-गंगा प्रतिष्ठान, श्रीप्रस्थ सिटीझन वेल्फेअर असोसिएशन, वसई तालुका पत्रकार संघ, मराठवाडा विधायक विकास संसद, साई-स्वरुप क्रिकेट क्लब आदी संस्थांचा समावेश आहे. युती सरकारच्या काळात श्री. कराळे यांनी (एस.ई.ओ.) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही पाच वर्षे लोकसेवेची जबाबदारी सांभाळली आहे.
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाशन (उद्घाटन) केलेल्या “महामुंबई” या मराठी साप्ताहिकाचे संपादक म्हणून अनेक वर्षे दत्तात्रय कराळे यांनी जबाबदारी सांभाळली. सन २००४ ते २०१८ या दरम्यान “कराळे समाचार” या मराठी दैनिकाची धुरा निष्ठेने, जिद्दीने सांभाळली. दरम्यानच्या काळात श्री. कराळे यांनी “महामुंबई देव दिवाळी” नामक वार्षिक विशेषांकाचे संपादक म्हणून तब्बल १८ वर्षे सातत्य टिकवत कर्तव्य पार पाडले. मधला काही काळ नालासोपारा प्रतिनिधी म्हणून “नवाकाळ” या प्रसिद्ध दैनिकातही कराळे यांनी काम सांभाळले. स्वतःचा ऑफसेट प्रिंटीग व्यवसाय सांभाळून दत्तात्रय कराळे यांनी हा सारा डोलारा पुढे नेण्याचे काम धावत्या मुंबईत पार पाडले आहे. सुमारे ५२ वर्षे अंग मेहनती बरोबरच आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळून श्री. कराळे यांनी पार पाडलेली पत्रकारिता वसई-विरारसह मुंबईतील असंख्य जणांनी अगदी जवळून पाहिलेली आहे. मागील दोन वर्षांपासून परभणीत वास्तव्यास आलेले श्री कराळे यांनी आराम करण्याऐवजी येथेही उपजिविका साध्य करीत करीत पूणे येथील “चालू वार्ता” नामक राज्यस्तरीय दैनिकात परभणी प्रतिनिधीच्या रुपाने पुन्हा सेवाकार्य सुरुच ठेवले. पत्रकारितेची जोडलेली नाळ तुटता कामा नये या जिद्दीने प्रेरित झालेले श्री कराळे यांचा दांडगा आत्मविश्वास बघून किंवा त्यांच्या अंगी असलेली तळमळ बघून पूणे येथील तरुण तडफदार उद्योजक, मराठवाडा भूमीपुत्र ज्ञानेश्वर लोखंडे-पाटील यांनी त्यांच्याच वृत्तपत्राचे आतापर्यंत प्रतिनिधीत्व सांभाळणारे श्री. कराळे यांच्यावर काल दि. ११ ऑगस्ट २०२२ पासून म्हणजेच नारळी पौर्णिमा नि रक्षाबंधनाच्या औचित्यावर वृत्तपत्र व यू न्यूज चॅनेल या दोन्ही विभागासाठी ‘परभणी जिल्हा उप संपादक’ म्हणून जबाबदारी सोपविली आहे. सत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले कराळे यांची जिद्द आजही तशीच दिसून येत आहे जशी तरुणाईत होती. सदर माध्यमांची वाढ, प्रगती आणि सुरक्षेसाठी रक्षा बंधनाच्या माध्यमातून श्री. लोखंडे-पाटील यांनी बांधलेले शिवबंधन पेलावे लागणार आहे. अर्थात हे सारे अत्यंत कष्टप्राय व महत्प्रयासी असले तरी निश्चितच पार पाडले जाईल असा विश्वासही दत्तात्रय कराळे यांनी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या नवनियुक्तीमुळे मित्र मंडळी व आप्तेष्ठांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
