दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दीपक काकरा.
जव्हार:-सामान्य पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अश्या पत्रकार संरक्षण समितीच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी जव्हार तालुक्यातील युवा पत्रकार मनोज कामडी यांची निवड करण्यात आली असून ही पत्रकार संरक्षण समिती संपूर्ण देशभरात कार्यरत असून शासनमान्य अशी संघटना आहे.जव्हार मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा शिरपामाळ येथे समितीचे संस्थापक-अध्यक्ष विनोद पत्रे,राज्य उपाध्यक्ष रामनाथ खुर्दळ यांनी पत्रकार कामडी यांना जिल्हाध्यक्ष पदाचे नवनियुक्तीचे पत्र देऊन एका युवा पत्रकाराला पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार कामडी हे मागील अनेक वर्षापासून जव्हार सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात काम करीत असून पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी बांधवांच्या समस्या मांडण्याचे काम करताना दिसत आहेत.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार मनोज कामडी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार बांधवांना येणाऱ्या अडी-अडचणी व समस्या त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी समितीचे नाशिकचे शहराध्यक्ष राजेंद्र भांड तसेच तालुक्यातील इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
