दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
एकरकमी एफआरपीची रक्कम दिल्याशिवाय राज्यात एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा शेट्टी यांनी ऊस कारखानदार व शासनाला दिला आहे.
परभणी : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लपवत खोटे अहवाल सादर करुन शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या पिक विमा अधिकाऱ्यांच्या पाठीत रुमणे आणि मालामाल होऊनही शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न देणाऱ्या कारखानदारांच्या पेकाटात लाथा घालाव्याच लागतील त्याशिवाय संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसांत न घेतला गेल्यास मात्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या भागात एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा माजी खासदार तथा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
कांही राजकीय पक्षांच्या मोर्चाच्या वेळी (अपवाद वगळता) शंभर कार्यकर्तेही उपस्थित नसतात परंतु शेतीतील महत्वाची कामे सोडून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी व आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकडोंच्यापेक्षाही किती तरी अधिक पटीने आपापले ट्रॅक्टर्स घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणाऱ्या शेतकऱ्यांचे राजू शेट्टी यांनी तोंड भरुन कौतुक करताना विद्यमान शासनावर मात्र पूरते तोंडसूख घेतले. ज्यांना ज्या खात्याचा गंधही नाही अशा मंत्र्यांकडे कृषी व आरोग्य खात्याचा पदभार सोपविला आहे. त्याची खिल्ली उडवत शेट्टी यांनी जगाचा पोशिंदा बळीराजा वर अन्याय करणाऱ्या शासनाचीही गय करणार नाही असे खडे बोल सुनावले.
मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनची लागवड फुलोऱ्यापर्यंत येऊनही पूर्ती वाया गेली. बियाणे, खते, औषधी, फवारणीसाठी अगोदरच कर्जबाजारी झालेला परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. त्यातच प्रशासकीय दूर्लक्षित यंत्रणेमुळे खोटे अहवाल सादर करुन पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेर्धात काल वसमत रोडवरील संत तुकाराम कॉलेजच्या प्रांगणातून काढण्यात आलेला विशाल असा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. राष्ट्रीय नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्य व जिल्हा पातळीवरील शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ऊसाचे धांडे व संघटनेचे झेंडे दिमाखात लावून सजवलेली मोर्चातील वाहने व संतप्त शेतकऱ्यांचा रोष पहाण्यासाठी परभणीच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी उल्लेखनीय अशीच दिसत होती.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालगतच्या मैदानावरील जाहीर सभेत व नियोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शासन, प्रशासन यांचे पिक विमा अधिकाऱ्यांशी असलेले साटेलोटे, हात ओले करणारे आर्थिक व्यवहार, ऊस कारखान दारीत सोन्याचे दिवस येऊनही शेतकऱ्यांना नेणारे बेमुर्वत कारखानदार आदींवर शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठविली. संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होऊनही खोटे अहवाल सादर करणाऱ्या आणि बोटावर मोजता येणाऱ्या केवळ आठ मंडळांकडे ही जबाबदारी सोपवून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीत रुमणे घालून वठणीवर आणावेच लागेल असा खणखणीत इशारा दिला. जागतिक पातळीवर साखरेला चांगली मागणी आहे. त्यामुळे ऊस कारखानदारीला सोन्याचे दिवस आले आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नाहीत. तिकडे पिक विमा कंपन्या व शासनाचे आणि इकडे ऊस कारखानदार व शासन यांचे साटेलोटे असल्यामुळेच विमा कंपन्या आणि ऊस कारखानदार कमालीचे शेफारले आहेत. त्या अधिकाऱ्यांच्याही पेकाटात लाथा घालाव्याच लागतील असा गर्भित इशारा देत शेट्टी यांनी आगामी आठ दिवसांत संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची अग्रीम रक्कम न दिल्यास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकाही मंत्र्यांना या भागात फिरकू देणार नाही असे खड्या आवाजात सूनावले. याप्रसंगी विद्यमान शासनावरही तोंडसुख घेत त्यांनी पूरती खंत व्यक्त केली. कोणाच्या तरी आशीर्वादाने चालणाऱ्या या विमा कंपन्यांची असून चौकशी होणे गरजेचे आहे. निजामकालीन जिल्हा असूनही त्याचा सर्वांगीण विकास न करता तो विकासापासून खूप दूर राहिला आहे, नव्हे नव्हे तो ठेवला गेला आहे असा घणाघाती आरोप करीत शेट्टी यांनी स्थानिक राजकारणी मंडळींविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. या आणि अशा अनेक विषयांचा उहापोह घेत शेट्टी यांनी शासनालाही सोडणार नाही असा गर्भित इशारा दिला. शेवटी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन शेट्टी यांनी एक लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
