दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भाजपा नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करुन परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाड्यांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. त्यावेळी बंदोबस्तावर तैनात पोलिसांनी संतप्त आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पराकाष्ठा केली.
वसमत रोडवरील. वसंतराव नाईक पुतळ्याजवळ ही निदर्शने करण्यात आली आहेत.
आज मंगळवार, दि. १३ डिसेंबर २२ रोजी ठिक १२ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर वादी विविध संघटनांच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबतीत केलेली वादग्रस्त विधाने राज्यात सर्वत्र टीकेचं लक्ष्य बनली गेली आहेत. त्याच अनुषंगाने परभणी शहरात सुध्दा आंबेडकरवादी विविध संघटनांनी एकत्र येऊन तीव्र संताप व्यक्त केला. हातात काळे झेंडे घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनांचा ताफा वसमत रोडवरील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ येताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. शेकडो जणांनी हातात निषेधाचे काळे झेंडे फडकावत तीव्र निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तथापि बंदोबस्तासाठी कर्तव्यावर तैनात पोलिसांनी आंबेडकरवादी चळवळीच्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी करण्यात आली.
