दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
कधी ४० तर कधी ४२ सेल्सीअस तर कधी ४४.८ सेल्सीअस पारा अशी आग ओकणारा सूर्यदेव गोऱ्या खोट्या माणसांना काळवंडून टाकत आहे.
परभणी : सूर्याचा वाढता कोप परिणामी जीवाची काहिली माजवणारी कमालीची उष्णता, त्यामुळे रस्त्यावर जणू कलम १४४ लागू झाल्यासारखेच दिसून येत आहे. रस्ते ओस पडायला कारणीभूत ठरणारी हिच उष्णता कुठे कुठे तर अक्षरशः जीव घेणारी ठरली जात आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरु नये. याच काहिलीपासून वाचण्यासाठी कोणी टोपी, कोणी कॅप तर कोणी रुमाल, उपरणे आदींचा आधार मोठ्या प्रमाणात घेतांना आढळून येत आहे. शरीर गोरं खोटं असलं तरी क्षणार्धात काजळी चढवणाऱ्या याच उन्हाला घाबरुन असंख्यजण तर भले आपली ओळख लपवून का होईना परंतु आपापले चेहरे रुमाल, उपरण्यात (गुंडाळून) बंदिस्त करुन फिरणेच चांगले समजतात. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांचा ससेमीरा असूनही त्यांना ठेंगा दाखविणारे सुध्दा आता सूर्यदेवाला मात्र घाबरुन डोक्यावर हेल्मेटचा आधार घेतांना आढळून येतात.
सकाळी दहा वाजेची वेळ असली तरी कमालीची उष्णता जाणवू लागते. जणू काही चटके दिल्यासारखेच अनुभवास येते. कुठे तरी सावलीचा आधार मिळतो का, रस्त्यावर कुठे थंड प्रेम, ताक, ऊसाचा रस, लिंबू सरबत किंवा अन्य काही थंड पदार्थ, किंवा पेयाची दुकाने, ज्यामुळे कांही अंशी का होईना परंतु गरमीपासून बचाव करता येईल, यासाठी प्रत्येकजण आसरा शोधतांना दिसतो. त्याचाच परिपाक म्हणून रस्त्याच्या कडेला, झाडाखाली कार्यरत छोटे छोटे स्टॉल, हॉटेल, ऊसाचे चरक स्थळ, आईस कॅन्डी, हातगाडेवाले किंवा मसालेदार ताक (मठ्ठा) आश्वाद खेचत असतात. अशी स्थानक जणू काही सीआयडीच्या नजरेनं बरेच जण न्याहाळत असतात. तशी ठिकाणं कमालीची गर्दी खेचून घेत असतात.
धरण उशाला अन् कोरड घशाला या उक्तीप्रमाणे रस्त्यांवर जागोजागी पाण्याचे मोठमोठे माठ, रांजण पाण्याने भरलेले दिसतात, त्यांना लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला दिसत असते. बऱ्याच ठिकाणी पाणपोईचीही सोय केली जाते. ही सर्व ठिकाणं आपोआपच आपल्याला तिकडे खेचत असतात. तरीही वाढत्या तापमानामुळे घसा सतत सुकल्या सारखा जाणवत असतो. उष्णतामान दिवसेंदिवस कमालीचे वाढले जात असल्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण आपोआपच कमी होत असते. त्यामुळे थकवा येणाऱ्या या शरिराला मात्र पाण्याची उणीव भासली जाते. त्याचाच परिपाक म्हणून सुकला जाणारा घसा कधी कधी ओला करता येईल, याचीच प्रत्येकांना काळजी लागून राहिली जाणे स्वाभाविक असते.
उन्हाळा कितीही असला तरी शेतकऱ्यांना मात्र पाचवीला पूजल्यागत शेतीची कामं बाराही महिने करावी लागतात. हिवाळ्यात, पावसाळ्यात ज्या जोमाने शेतीत कामं केली जातात तशी उन्हाळ्यात मात्र करीत नसतात. जीवाची कितीही तगमग होत असली तरी जी कामं आवश्यक आहेत, त्याचा उरक करण्यावर अधिकाधिक भर असतो. दुपारी जेवायला घरी आल्यानंतर
मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत आराम करीत असतात. तेवढाच काय तो विसावा त्यांना मिळत असतो. झाडं, झुडपे, पाचटीचं झोपडी किंवा एखादं घर नसेल तर कित्येकजण मात्र एखादी कोटी किंवा चार लाकडं रोवून त्यावर फाटका कपडा, कणतानं किंवा झाडांच्या फांद्या टाकत असतात. ज्यामुळे थंड हवेचं ठिकाण निर्माण केलं जातं. व्यापारी, आडते, दुकानदार हे उन्हाचा चढता पारा असला तरी नाईलाज म्हणून पडेल ती कामं सतत करीतच असतात. वाढते उष्णतामान ध्यानी घेऊन शाळेला सुट्टी लवकरच जाहीर केली गेली असली तरी पुढील शालेय वर्षाच्या पूर्व तयारीसाठी सुरु होणारे क्लास आता काही दिवसांवर येऊन ठेपले गेले आहेत. नवीन वर्षे, सुरु होणाऱ्या शाळा, घेणे आवश्यक असलेले पुढच्या वर्गातील प्रवेश, वह्या, पुस्तके, गणवेश आदींसाठी पाल्य व पालकांची लगीनघाई जोरात सुरू आहेच. त्यातच लग्न सराईचा सिझन असल्याने ज्यांच्या मूळ पत्रिका, पत्रिका येतात, कीर्तन, प्रवचन, सप्ताह, भंडारा, जयंती सोहळे, गृहप्रवेश, वास्तू शांती सोहळे, पूण्यस्मरण, तेरावं आदींचे आमंत्रण-निमंत्रण येतात, आवर्जून ते स्वीकारणे व उपस्थित राहाणे हे सतत सुरुच असतं. कडक उन्हाचा कारण देऊन ते टाळता येणं अशक्यप्राय असतं. जनावरांना चारा, वैरण, पाणी पाजणे आदी कामे ठरल्या वेळी करावीच असतात.
