वक्फ (सुधारणा) विधेयक काही दिवसांपूर्वी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली.
त्यामुळे वक्फ (सुधारणा) विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ (सुधारणा) विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केले, काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवले’, असे आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केले. ते आज हरियाणामधील एका सभेत बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसने फक्त मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केलं. नवीन कायद्याला त्यांचा विरोध हेच सिद्ध करतो. काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही? तसेच काँग्रेस निवडणुकीत ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी का राखीव ठेवत नाही?”, असे सवालही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष त्यांच्या सरकारला प्रेरणा देते. प्रत्येक निर्णय आणि धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. पण विरोधी पक्षाने (काँग्रेसने) सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवलं. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. पण दुर्दैवाने काँग्रेस यालाही विरोध करत आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.
