दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : सह्यादी देवराई व भारती विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ आणि २६ एप्रिलला महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन भारती विद्यापीठाच्या पुणे सातारा रोड येथील धनकवडी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणार असून यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सह्याद्री देवराईचे संस्थापक,अध्यक्ष व अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या संमेलनामध्ये दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता हरित संपत्तीचे दालन या प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या हस्ते होणार असून पर्यावरणतज्ञ एस. आर. यादव व उपवन संरक्षक,पुणे महादेव मोहिते उपस्थित राहणार आहेत. तर त्याच दिवशी सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत सह्याद्री देवराईचे दहा तज्ञ सदस्य भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना ताम्हिणी घाटात बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी भारती विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून भारती विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी आणि सह्याद्री देवराईचे पर्यावरणप्रेमी मिळून राज्यातून बिया गोळा करणार आहेत. तसेच सांयकाळी ६ ते ९ यावेळेत पर्यावरण विशेष चर्चासत्र होणार असून त्यात संजय पाटील, डॉ. मंदार दातार, डॉ. अपर्णा वाटवे, सुहास बैंगणकर हे तज्ञ सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. इरीच भरुचा या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. पर्यावरण तज्ञ सी.बी.साळुंखे व सह्याद्री देवराईचे उपाध्यक्ष अरविंद जगताप यावेळी प्रमुख अतिथी असणार आहेत.
दि.२६ एप्रिल रोजी अनेक प्रकारच्या बियांचं देशी वाण जपण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाया बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये व सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार ख्यातनाम ज्येष्ठ शास्त्रीय गायक आर्चाय पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांची बीजतुला करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदाना विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. त्या बीजातून रोपवाटिका तयार करण्यात येणार असून या रोपांची लागवड भारती विद्यापीठाच्या जागेत करून त्या देवराईची देखभाल भारती विद्यापीठातील विद्यार्थी करणार आहेत.
संमेलनाची वैशिष्ट्ये
या संमेलनामध्ये देवराईची संक्षिप्त प्रतिकृती. विविध कडधान्य व पालेभाज्यांच्या बियांचे प्रदर्शन, विविध वनस्पतीचे बीज रोप व पानाचे प्रदर्शन, बियांची बाराखडी व वर्णमाला, विविध वनस्पतीच्या कंदांचे प्रदर्शन, आदर्श पाणवठ्याची प्रतिकृती, निसर्गावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन, पालखी मधील वृक्ष दिंडी, जुन्या कपड्यांपासून उपयोगी पिशव्यांचे प्रदर्शन होणार असून लहान मुलं आणि तरुण पिढीला झाडांची गोडी लागावी म्हणून बनविण्यात आलेल्या गाण्यांचे लोकार्पण आणि सादरीकरण होणार आहे तसेच यावेळी सह्याद्री देवराईतर्फे राज्यात केलेल्या कामांची चित्रफित दाखविण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणारे तज्ञ आणि सह्याद्री देवराईच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाया मंडळींचा सत्कार आणि मार्गदर्शन या संमेलनात होणार आहे.
