
शरद पवारांच्या शिलेदाराचा अजित पवारांना टोला…
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोर लावण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवस हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हडपसरमध्ये पक्षाची मोठी बैठक घेतली.
या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शनिवार आणि रविवार हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी रस्ते, पूल आणि इतर विकासकामांची पाहणी केली.
तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. अजित पवारांनी मतदारसंघातील रस्त्यावर उतरून विकास कामांची पाहणी आणि नागरिकांची संवाद साधला यारूनच आता प्रशांत जगताप यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, भाजप राज्यात, देशात मोठा पक्ष आहे. तरीही आपण शहरात त्यांच्याबरोबर काम करत आहोत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा आहे. त्यांनी पुणे शहराचे वाटोळे केलं आहे.
जगातील सर्वात वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये जागतिक स्तरावर पुणे शहराचे पाचवे नाव आहे. ही अभिमानाची गोष्ट नाही. याला जबाबदार शहराचे शिल्पकार म्हणून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच या शहराचे भाग्यविधाते म्हणून पालकमंत्री अजित पवारांचे देखील बॅनर लागतात ते देखील याला जबाबदार आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून माझा 7000 मतांनी पराभव झाला असला तरी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला गल्लीबोळात फिरावे लागत आहे. यातच सगळं आलं अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.