
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व वॉर्डांमध्ये निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.
मनसेशी युतीबाबत चर्चा सुरू असून, लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल आणि दसरा मेळाव्यात त्याचे संकेत दिले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच, युतीच्या निर्णयापर्यंत सर्व वॉर्डांमध्ये अशी तयारी करा की मनसेला आपली मदत मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणूक रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “गटप्रमुख आणि शाखाप्रमुख हे शिवसेनेचे जीव की प्राण आहेत. मात्र, ज्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरले आणि जे आम्हाला सोडून गेले, त्यांच्यापैकी काही परत आले तरी त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.