
UAE विरुद्धच्या सामन्यावरील बहिष्कार मागे…
पाकिस्तान क्रिकेट संघाचा यूएईविरुद्धचा सामना अखेर होणार आहे. हा सामना एक तासाच्या विलंबाने सुरू होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सामना न खेळण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील आशिया कप २०२५ चा १० वा सामना रात्री ९ वाजता सुरू होईल. आशिया कपचे अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्सने याची घोषणा केली. आजचा सामना पाकिस्तान आणि यूएई दोघांसाठीही महत्त्वाचा आहे, कारण जो संघ जिंकेल तो सुपर फोरसाठी पात्र ठरेल.
पीसीबी तोंडावर आपटले
भारतासोबतच्या ‘हँडशेक’ वादामुळे पीसीबीने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. त्यापूर्वी त्यांनी त्यांनी आयसीसीकडे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना बदलण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने त्यांची मागणी फेटाळली.
खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबण्याचा आदेश
पीसीबीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबण्यास सांगण्यात आले होते. पीसीबीने आयसीसीकडे ई-मेलद्वारे दोन मागण्या केल्या होत्या. यात मॅच रेफरी बदलणे आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या राजकीय विधानावर त्यांनी आक्षेप घेतला होता.
पाकिस्तानचा संघ मैदानाकडे रवाना
अखेर, पाकिस्तानचा संघ मैदानात उतरण्यास तयार झाला आहे. संघ बसमधून स्टेडियमकडे रवाना झाला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
आतापर्यंतचा घटनाक्रम जाणून घ्या
१४ सप्टेंबर : टीम इंडियाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा सामन्यानंतरच्या सादरीकरणाला उपस्थित राहिला नाही. टीम इंडियाच्या कृतीवर पाक संघाचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी नाराजी व्यक्त केली.
१५ सप्टेंबर : पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध भारताची बाजू घेतल्याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल केली आणि पीसीबीने त्यांना आशिया कप सामन्यांमधून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली.
१६ सप्टेंबर : आयसीसीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पीसीबीची मागणी फेटाळली. त्यानंतर पीसीबीने युएई विरुद्धच्या सामन्यासाठी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी असल्यास मैदानात उतरणार नाही अशी धमकी दिली. पाकिस्तानने त्यांची नियोजित सामन्यापूर्वीची मीडिया कॉन्फरन्स रद्द केली. तथापि, त्यांनी आयसीसी अकादमीच्या मैदानावर पूर्वी नियोजित सराव सत्र पूर्ण केले. पीसीबीने आयसीसीला दुसरे पत्र लिहून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची पुन्हा मागणी केली.
१७ सप्टेंबर : सामना सुरू होण्याच्या सुमारे तीन तास आधी, परिस्थिती वेगाने बदलली. दुबईमध्ये आयसीसीची आपत्कालीन बैठक झाली. त्यानंतर, हॉटेल सोडण्यास पाकिस्तानी संघाला मज्जाव करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला की पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर पडेल आणि लवकरच घरी परतेल. पाकिस्तान बोर्डाने एक बैठक घेतली. या बैठकीनंतर, सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. संघ हॉटेलमधून स्टेडियमकडे रवाना झाला. ज्यामुळे सामना रात्री ९:०० वाजता सुरू होईल, त्याआधी टॉस रात्री ८:३० वाजता होईल, असे सांगण्यात आले.