दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज सिद्धार्थ उद्यानातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना व स्वातंत्र्य सैनिक पाल्यांच्या शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्याने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 29 सप्टेंबर 2025 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याच्या सूचना झाल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे, या विषयावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत नवीन उच्चस्तरीय बैठक घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेने शासनाला स्मरण करून दिले की, स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख व स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवेदनावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब सोळुंके पाटील, सचिव आप्पासाहेब शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब चोंधे, ज्येष्ठ नेते मारोतराव जाधव, वसंतराव देशमुख, तसेच दिनेश पारीख, अशोकराव पुंगळे, सुरेंद्र कुमोद, कचरू वाढेकर, गणेशराव कुमोद, विश्वनाथ राऊत, सुनील सोळुंके, गणेश लोखंडे यांसह स्वातंत्र्य सैनिक परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.