
…तर मला कशाला त्रास सहन करावा लागला असता !
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाची फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकार्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, कुर्डुवाडी मुरूम प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
आता पांदण रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी कोणतीही रॉयल्टी लागणार नसल्याच्या निर्णयाबाबत सांगत हा निर्णय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच घेतला असता तर मला कशाला त्रास सहन करावा लागला असता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच हा निर्णय आता सोलापूरला देखील कळवा, असंही अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
पांदण रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी आता मुरूम काढल्यास रॉयल्टी लागणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्त, तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात. सर्व अधिकाऱ्यांना सूचना द्या. पांदण रस्त्यावर जर मुरूम टाकला तर त्यासाठी बंदी नाही, परवानगी आहे आणि ते सोलापूरला देखील कळवा. तसेच महाराष्ट्रात देखील चांद्यापासून ते बांध्यापर्यंत कळवा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब गेल्या महिन्यांत हा निर्णय घेतला असता तर काय वाईट झालं असतं? कशाला मला त्रास झाला असता? काही कारण नसताना. नाही त्या गोष्टींचा गवगवा होतो. पण जाऊद्या आता काही हरकत नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
सोलापूरमधील मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले की, ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा. मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि तुमच्यावर कारवाई करू, असं म्हटलं होतं.
“तुमचा मोबाइल नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो. तुमची एवढी हिंमत झाली का?”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडीओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले होते.
अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?
अजित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असं अजित पवार म्हणाले होते.