
दैनिक चालु वार्ता वाघोली प्रतिनीधी – आलोक आगे
वाघोली-केसनंद रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली असून वाहनधारकांसह नागरिकांना ये-जा करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने करूनही रस्त्याची ‘जैसे थे’ स्थिती आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी दौरे करून थातूरमातूर खड्डे बुजवण्यापुरतेच काम करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत वाघोली-केसंनद रस्त्यालगत ‘केसंनद रोडच्या समस्या सुटणार का?’ अशा आशयाचा मजकूर असलेले फ्लेक्स लावून स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
वाघोली-केसनंद रस्त्याची काही वर्षांपासून अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. अनेकवेळा आंदोलने देखील केली. निष्क्रीय लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी दौरे करून थातूरमातूर खड्डे बुजविले. आपण कसे नागरी समस्या सोडवण्यात अग्रेसर आहोत हे दाखवण्यासाठी रील्स बनवून स्वतःची पाठ स्वतःच थोपटवून घेत असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.
वाघोली-केसनंद हा रस्ता थेऊर मार्गे सोलापूरला जोडणार महत्वाचा राज्य मार्ग असून या रस्त्यावर नागरिकांसह वाहनांची प्रचंड वर्दळ असते. गेली अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असून पडलेल्या खड्ड्यांमुळे व पावसाळी व सांडपाणी नाल्याअभावी नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अधूनमधून मोठ्याप्रमाणावर रस्त्याने वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरी समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेली अनेक वर्षांपासून केसंनद रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा यासाठी अनेक आंदोलने झाली. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देण्यात आली. आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्ती करणेबाबत साकडेही घालण्यात आले. परंतु अद्यापही वाघोली-केसनंद रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला नाही.
केवळ थातूरमातूर खड्डे बुजवून ‘आम्ही समस्या सोडवण्यात अग्रेसर’ असल्याचे दाखवण्यासाठी केवळ सोशल मीडियावर रील्स टाकून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या निष्क्रीय स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांचा रोष वाढला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे ढोंगी आश्वासनाचे राजकारण ओळखून वाघोलीतील नागरिकांनी आगळा मार्ग अवलंबला आहे. वाघोली-केसनंद रोडलगत ठिकठिकाणी ‘केसनंद रोडच्या समस्या सुटणार का?’ असे लिहिलेले फलक लावून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्त्यालगत लावण्यात आलेल्या फलकावर मागील २-३ वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी व राजकारण्यांचे दौरे झाले पण काम मात्र 0 (ZERO) असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, झालेली वाहतूक कोंडी, पावसाळ्यात झालेली पूर स्थिती असे फोटो टाकण्यात आले आहेत. त्याबरोबर एका बाजूल नेत्याचे चित्र दाखवण्यात असून कार्यकर्त्याच्या हातात इंग्रजीमध्ये ‘हमारा नेता जिंदाबाद’ असा फलक आहे.
नैसर्गिक ओढे-नाले नेमके गेले कुठे?
ड्रेनेज अभावी आयव्ही (ivy) इस्टेट परिसरातील पाणी मोकळ्या जागेतून केसनंद रोडवर सोडले जात आहे. त्यामुळे केसंनद रोडवरील व्यावसायिकांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नैसर्गिक ओढे-नाले नेमके गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर नागरिकांमधून संतापाचा उद्रेक दिसून येत आहे. सततच्या हालअपेष्टा, जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच पाण्याचा निचरा होत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित अधिकाऱ्यांचे केवळ आश्वासने व कागदी घोडे नाचवले जात आहेत, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे आगामी काळात नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहा. आयुक्त शीतल वाकडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती घेते असे सांगितले.
वाघोली-केसनंद रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. विशेषतः कोणार्क व इपिक सोसायटी समोर रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता प्रशासनाने तात्काळ ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. – सुभाष महादेव कोलते (चेअरमन, कोणार्क ओअॅसिस सोसायटी, केसनंद रोड, वाघोली)
वाघोली-केसनंद रोड परिसरात भेडसावणारी ट्रॅफिकची समस्या, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी व पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृश परिस्थिती या गोष्टींकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना त्वरित करणे गरजेचे आहे.- चेतन जगताप, केसनंद रोड, वाघोली