
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधि – अशोक पाटील तेलंग
कंधार (प्रतिनिधी) – कंधार येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत माणिक प्रभू विद्यालयाने उत्तुंग कामगिरी करत व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद मिळवले. एकाच वेळी दोन गटात प्रथम क्रमांक पटकावत या विद्यालयाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, दमदार खेळ व शिस्तबद्धता दाखवून प्रतिस्पर्ध्यांना नमवले. त्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे आता जिल्हास्तरीय स्पर्धेत माणिक प्रभू विद्यालयाचे प्रतिनिधित्व निश्चित झाले आहे.
या विजयानंतर खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला असून संघाला विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक श्री. रजाक शेख व श्री. सुधाकर जाधव यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण व प्रेरणेमुळे खेळाडूंनी ही कामगिरी साध्य केली, असे मत संघसदस्यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष व मा. जि.प. सदस्य मा.श्री. मनोहरराव बापुराव पा. तेलंग, सचिव डॉ. श्याम बापुराव पा. तेलंग, उपाध्यक्ष श्री. बालाजी पा. वडजे, कर्मवीर इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा. डॉ. सुरेश मनोहरराव पा. तेलंग, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष गिरे, पर्यवेक्षक शादुल मुंजेवार सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
अध्यक्ष मा. मनोहरराव पा. तेलंग यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नाव कमावले म्हणजे तेवढेच आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळाडू यश संपादन करून शाळेचा मान अधिक उंचावतील, असा विश्वास आम्हाला आहे.”
या दुहेरी विजयानंतर माणिक प्रभू विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले असून संपूर्ण परिसरातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.