
कोंडी कशी फुटणार शरद पवारांनी सांगितला तोडगा; मोठं वक्तव्य…
सरकारने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला आहे, या जीआरनंतर मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आल्याचं चित्र आहे, या जीआरला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजानं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान हे गॅझेट लागू करण्याचा जीआर काढल्यानंतर आता बंजारा समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे, आमचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी बंजारा समाजाची आहे, तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे, राज्यात सध्या मराठा समजाविरोधात ओबीसी समाज आणि बंजारा समाजाविरोधात आदिवासी समाज असं चित्र पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
आज मुक्तिसंग्राम दिवस साजरा केला जात आहे, आज आनंदाचा दिवस आहे, मात्र दुर्दैवानं तसं चित्र दिसत नाहीये, मी एका ठिकाणी सांगितलं होतं समाजाची वीण दुबळी होत आहे. आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजानं मोठा मोर्चा काढला, त्यांची मागणी आहे, आमचा समावेश हा आदिवासी समाजामध्ये करावा. बंजारा समाजानं मागणी करताच दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. आता दोन कमिट्या नेमल्या, दोन समित्या केल्या, या दोन समित्या करायची आवश्यकता होती का? एक एका जातीची आणि दुसऱ्या दुसरी जातीची. त्यामुळे दुसऱ्या घटकाचं मत विचारातच घेतलं जाणार नाही. इथे सामंजस्य आणि एकता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना एकत्र बसाव लागेल, रास्त मागण्याची पूर्तता कशी करता येईल, हे पाहिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी या सर्वांमध्ये एक वाक्यात कशी येईल हे पहिला पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोयाबीन कापूस , या पिकांचं अधिक नुकसान झालं आहे. उसाचं देखील मोठं नुकसान झालं आहे, आमच्याकडे जी माहिती आली, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचलं, सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी वाहिलं हे मी कधी ऐकलं नव्हतं. पुणे जिल्ह्यात देखील प्रचंड नुकसान झालं आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.