
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर सही केल्या. पाकिस्तान भारताविरोधात लढण्यासाठी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले.
हेच नाही तर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्धवस्थ केले. पाकिस्तानी लष्कर भारताच्या या हल्ल्यांना प्रतिउत्तर देऊ शकले नाही. रिपोर्टनुसार, दोन्ही देशांनी या कराराला स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अॅग्रीमेंट असे नाव दिले आहे. थोडक्यात काय तर जर एका देशावर हल्ला झाला तर दोन्ही देशांवर झाला असे मानले जाईल.
जर भारताने किंवा इतर कोणत्या देशाने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो सौदी अरेबियावरही केल्याचे मानले जाईल.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सौदी अरेबिया दाैऱ्यावर होते आणि त्यांनीच हा करार केला. शाहबाज शरीफ हे रियाधला पोहोचले होते. अल-यामामा पॅलेसमध्ये क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी या करारावर सह्या केल्या.
जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा करार दोन्ही देशांमधील जवळजवळ आठ दशकांच्या भागीदारीवर आधारित आहे. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, हा करार केवळ द्विपक्षीय सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यासाठी नाही तर त्यांचा उद्देश प्रादेशिक आणि जागतिक शांततेत योगदान देणे आहे. शाहबाज शरीफ यांच्या या दाैऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या, शेवटी त्यांनी करारवर सह्या केल्या आहेत.
मागील काही वर्षांत पाकिस्तानच्या भारताच्या विरोधातील कुरापती वाढल्या आहेत. मात्र, भारत आता थेट सडेतोड उत्तर पाकिस्तानला देताना दिसतोय. घरात घुसून मारणारा हा नवा भारत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्याला भारताने थेट उत्तर देत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. हेच नाही तर पाकिस्तानातील जैशच्या कमांडरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये त्याने मोठा दावा मसूद अझहरबद्दल केलाय.