
रोहित पवारांनी उपस्थित केला मुद्दा…
राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना तात्काळ मदत दिली जावी अशी मागणी विरोध पक्षांकडून केली जात आहे.
यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे डबल बेड मॅट्रेस, सोफा आणि इतर कामांसाठी केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चावरून रोहित पवारांनी टीका केली आहे.
राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून सरकारकडे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी पैसे नाहीत. कर्जमाफी दिली जात नाही आणि राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ४० लाखांहून अधिक खर्च केले जात असल्यावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.
रोहित पवारांची पोस्ट
वर्षा बंगल्यात दुरुस्तीसाठी होत असलेला खर्च ही जनतेच्या पैशाची उतमात की वाढलेली महागाई असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोजा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?’
‘मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरूस्तीची कामं केली पाहिजेत पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना..!’ असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये मालबार हीव मुंबई येथील वर्षा बंगला येथील कामाची ई-निविदा देखील पोस्ट केली आहे. ज्यामध्ये या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. दरम्यान रोहित पवारांच्या या पोस्टवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची शक्यता आहे.