
आशिया कपमधील फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगला त्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे .मात्र यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर, देशात आणि राज्यात देखील मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबाबत ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून साजरा करण्यात येणारा दसरा मेळावा ऑनलाईन स्वरूपात करून त्याचा निधी पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, यावर देखील राजकारण सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील भाष्य केले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमोल कोल्हे यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य केले. अमोल कोल्हे म्हणाले,राज्यातील आपतग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव मदतीने अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. परंतु अजून कोणतीही मदतीची ठोस घोषणा झाली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील बेडरूमसाठी वीस लाख पन्नास हजारांची तरतूद होते. किचनसाठी 19 लाखांची मदत होते. परंतु शेतकऱ्यांना घोषित झालेली पहिली मदत अवघी साडेतीन हजार रुपये आहे. पिके जनावरे वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे. पंजाब मध्ये आलेल्या पुरानंतर त्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेकडून भरवण्यात येणारा दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा असा सल्ला भाजपाकडून देण्यात येत आहे. त्यावर बोलताना कोल्हे म्हणाले, हा ज्या त्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे. राजकारणातील विषयांपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणं हेच सध्या महत्त्वाचे आहे. यापासून विषयांतर करण्यासाठी कुठल्याही इतर विषयांना महत्त्व देऊ नये.
मात्र, ज्या पद्धतीने राज्यातील होणारे दसरा मेळावे रद्द करून त्या बाबतचा निधी शेतकऱ्यांना देण्याच्या गोष्टी करण्यात येणार आहे . त्याच पद्धतीने काल जो भारत पाकिस्तान मध्ये फायनल चा सामना झाला तो सामना अनेक थेटरमध्ये दाखवण्यात आला. त्यातून निर्माण झालेला निधी हा सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे येणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण इतर गोष्टींबाबत बोलू असं अमोल कोल्हे म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्रमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्या ठिकाणी काढता पाय घेतला. याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, ही अत्यंत असंवेदनशील गोष्ट आहे. या पुरामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचे सर्वस्व वाहून गेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून त्यांच्या पाठीशी ठाम उभ राहणं हे सरकारचं काम आहे.