
कसा असणार पुणे मेट्रोचा मास्टरप्लॅन ?
पुणे (Pune) शहराच्या मेट्रो विस्तारासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (21 सप्टेंबर) एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. फुगेवाडी येथील मेट्रोच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत ‘महामेट्रो’, ‘एमएसआयडीसी’ आणि इतर सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मेट्रोचे जाळे अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील भक्ती-शक्ती चौक ते चाकण या मेट्रो मार्गाचे सादरीकरण झाले. या मार्गाचा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला आहे. पिंपरी ते शिवाजीनगर मार्गाचे काम सुरू असतानाच आता या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अजित पवार यांनी ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांना या मार्गाचा विस्तार तळेगाव दाभाडेपर्यंत करता येईल का, याची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
महामेट्रोने प्रस्तावित केलेल्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या मार्गांवरही ‘एमएसआरडीसी’ (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) आणि ‘एनएचएआय’कडून काम केले जाणार आहे. या दोन्ही मार्गांचे एकत्रित नियोजन करून त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या मार्गावर दुहेरी उड्डाणपूल बांधण्याची चर्चा झाली आहे. या प्रकल्पासाठी निधी कसा उभा करायचा, यावरही चर्चा झाली. मेट्रोकडून काही प्रमाणात आर्थिक नियोजन झाले असले, तरी उर्वरित खर्च ‘एनएचएआय’ (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) किंवा राज्य सरकारकडून घेण्याबाबत पर्याय तपासला जात आहे. रामवाडी ते ते वाघोली (विठ्ठलवाडी) मेट्रो मार्ग आणि अहिल्यानगर महामार्ग एकत्रित करण्याबाबत पवार यांनी अधिकाऱ्यांना रविवारी सूचना दिल्या आहेत.
पुण्यात होणाऱ्या पुरंदर येथील नवीन विमानतळाला पुणे शहराशी जोडण्या बाबतही बैठकीत चर्चा झाली. मेट्रोचा वापर करून शहरातून विमानतळावर जलद पोहोचता यावे, यासाठी काही खास तरतुदी करण्याच्या शक्यतांवर विचार करण्यात आला. या सर्व प्रकल्पांसाठी ‘पीएमआरडीए’, ‘पीडब्ल्यूडी’, ‘पीसीएमसी’, ‘पीएमसी’ आणि ‘रस्ते विकास महामंडळ’ मिळून एकत्रितपणे काम करतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
भोसरी येथील वाहतूक सुधारण्यासाठी जुना चार पदरी पूल पाडून त्या जागी तीन मजली उड्डाणपूल बांधला जाईल. या नवीन उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यावर सहा पदरी रस्ता, दुसऱ्यावर आठ पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. या विषयांवर काल चर्चा झाली असून मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.