
लोकांसाठी लढतोय; स्टाईल बदलणार नसल्याचा रोहित पवारांचा इशारा…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात घेतलेली आमसभा चांगलीच गाजली.
रोहित पवार यांनी लोकांच्या तक्रारीचं निरासन होत नाही म्हणून भरसभेत अधिकाऱ्याला झापले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले.
यावरून रोहित पवार-अंजली दमानिया-सुषमा अंधारे यांच्यात ‘ट्विटर वाॅर’ रंगले. आता रोहित पवार यांनी उद्घाटनापूर्वीच राम शिंदे यांच्या निधीतून बांधलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यावरून अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर निशाणा साधला. आम्ही जमिनीवर राहून लोकांसाठी लढणारे आहोत, कुणाला बरं वाटावं म्हणून आम्ही आमची स्टाईल आणि स्वभाव बदलणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार यांनी याबाबत त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत, कामाच्या निकृष्ट दर्जामुळं आमसभेत अधिकाऱ्यावर ओरडल्याबद्दल अनेकांनी गळे काढले, पण कशी बोगस कामं होतायेत ते बघा! असे म्हणत, भाजपचे (BJP)विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निधीतून तीन कोटी रुपये खर्च करून विंचरणा नदीवर उभारलेला लोखंडी पूल उद्घाटनाआधीच रात्री पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याकडे लक्ष वेधले.
पाऊस जोरदार सुरू आहे. पण त्यात काल पूर्ण केलेलं कामही सहज वाहून जात असेल तर, याबाबत बोलायचं नाही? असा प्रश्न देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला. बोगस कामामुळंच सामान्य जनतेच्या टॅक्समधून कोट्यवधी रुपये खर्चून केलेलं काम वाहून जात असेल तर, ही कामं काय केवळ टक्केवारी घेण्यासाठी मंजूर केली जातात का? असा गंभीर प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अशाच बोगस कामांमुळे आमचं डोकं गरम होतं आणि पुढंही ते होत राहील. आम्ही जमिनीवर राहून लोकांसाठी लढणारे आहोत. पण कुणाला बरं वाटावं म्हणून आम्ही आमची स्टाईल आणि स्वभाव बदलणार नाही, असा थेट इशारा देखील रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधील आमसभेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. भरसभेत अधिकाऱ्यांना असे झापल्याने त्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर रोहित पवार यांच्यावर चौहूबाजूने टीका झाली.
रोहित पवार यांनी देखील अंजली दमानिया यांना जशासतसे उत्तर दिले. या ट्विटर वाॅरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत, अंजली दमानिया यांना भाजप कसं दिसत नाही, असा प्रश्न केला. परंतु अंजली दमानिया यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर देते, आठवडाभर थांबा, मोठा धमका करणार आहे. त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही, असे प्रत्युत्तर दिले.
पण रोहित पवार यांनी टायमिंग साधत कर्जत-जामखेडमधील विंचरणा नदीवरील प्रा. राम शिंदे यांच्या निधीतून बांधलेला लोखंडी पूल उद्घाटनापूर्वी वाहून गेल्याने अधिकाऱ्यांच्या टक्केवारी कामकाजावर निशाणा साधला आहे. संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांना सुनावत, लोकांसाठी लढत असल्याने कुणाला बरं वाटावं म्हणून आम्ही स्टाईल बदलणार नसल्याचे स्पष्ट सांगून लढा तीव्र करणार असल्याचे सांगितले.