
निलंबन दिखावा होता का; कोळी बांधवांचा सवाल…
वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलेले माजी उपनेते राजेश शहा यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सक्रिय झाले आहे.
शिवसेनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राजेश शहा यांना व्यासपीठावर स्थान मिळत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र हे प्रकरण काहीसे मागे पडले आहे. त्यामुळे राजेश शहा हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पुन्हा काही कार्यक्रमांत दिसू लागले. त्यामुळे निलंबन हा दिखावा होता का? असा संतप्त सवाल पालघरचे कोळी बांधव करू लागले आहेत.
राजेश शहा यांनी शिवसेनेत सक्रिय असल्याची प्रतिक्रिया देत, आणखी धक्का दिला आहे. माझ्या पदाला स्थगिती होती. पण मी शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेत (Shivsena)होतो. माझ्याकडे कुठलेही पद सध्या नाही. पण मी कार्यक्रमात असलो तरी, कोणाच्या पक्षप्रवेशबाबत मला काही माहिती नाही, असे राजेश शहा यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे इथं पालघरमधील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. मात्र हा पक्षप्रवेश वादात सापडला आहे. शिवसेनेत असणाऱ्यांनाच काही पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षप्रवेश करवून घेतल्याची चर्चा आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे, एकनाथ शिंदे यांची फसणवूक असल्याची चर्चा पालघरमध्ये रंगली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत पालघरमधील काही सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांचा ठाणे इथं येत शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. प्रवेश केलेले घिवली ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र दळवी, उपसरपंच भावेश धर्ममेहेर हे पूर्वीपासून शिवसेनेत आहेत. मग पुन्हा प्रवेश करण्याचे कारण काय? ही फसवणूक नाही का? अशी चर्चा रंगली आहे.
गेल्याच महिन्यात पाचमार्ग व घिवलीत झालेल्या छत्री वाटप कार्यक्रमात जिल्हाप्रमुख कुंदन संखे व उपनेत्या ज्योती मेहेर यांच्यासह ते उपस्थित होते. तर धाकटी डहाणू इथले सरपंच सुरेंद्र राबड व त्यांची पत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्य काजल राबड हे सुद्धा शिवसेनेतच असून निवडणुकीत गावित यांच्या प्रचारात ते सक्रिय होते.
मी एकनाथ शिंदे शिवसेनेसोबतच…
असे असताना एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपले महत्त्व वाढवण्याकरिता काहींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश घ्यायला लावल्याची चर्चेने जोर धरला आहे. माजी उपनेते राजेश शहा यावेळी हजर होते. त्यामुळे राजेश शहा यांची ही उपस्थिती कोळी बांधवाना खटकली आहे. यातच राजेश शहा यांनी, मी एकनाथ शिंदे शिवसेनेसोबतच आहे, असे सांगितले. भावेश धर्ममेहेर यांनी राजेश शहा यांनी मला फोन करून बोलावले म्हणून गेलो आणि पक्षप्रवेश करून घेतला’, असे सांगितल्याने हे पक्षप्रवेश पुन्हा चर्चेत आले आहेत.
राजेश शहा यांचे जुलै 2024 मध्ये निलंबन
वरळी इथं हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जुलै 2024 मध्ये निलंबनाची कारवाई केली होती. आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी कार्यरत होते. या निलंबनानंतर राजेश शहा पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकनाथ शिंदेंबरोबर कार्यक्रमात दिसत आहेत.