
विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांना होत नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवर फोटो लावण्यावरून शिवसेना उबाठाने निशाणा साधला. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, “इथे राजकारण करण्याची गरज नाही, पूरग्रस्तांना सर्वांनी मिळून मदत करायला हवी. जिथे राजकारण करायचे आहे तिथे राजकारण करा,” असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
इथे राजकारण करण्याची काही वेळ नाही. सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे. त्यामुळे राजकारण करायच्या वेळेस राजकारण केले पाहिजे. सध्या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची वेळ आहे. त्यांचे अश्रू पुसायचे आहेत. त्यांची परिस्थिती काय ती बघा, नंतर राजकारण करा.” असे म्हणत एकनाथ शिंदेनी विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, “मराठवाड्यामधील सद्यस्थितीचा मी आढावा घेतला, तिथे पूरग्रस्तांना आम्ही मदत पाठवली आहे आणि अजूनही मदत पाठवण्यात येणार आहे. तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. आमची सर्व टीम तिथे पुर्ग्रास्त्नाच्या मदतीसाठी तत्पर आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांना मदत करताना नियमांवर बोट ठेवले जाणार नाही. त्यांच्यासाठी काही अटीशर्थी शिथिल करून पूरग्रस्तांना भरीव मदत केली जाईल.” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या मागे उभे रहाणे गरजेचे आहे. जिथे जिथे नुकसान झाले आहे, तिथे तिथे तात्काळ मदत पोहोचवण्याचे काम, अडचणीत असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम तेथील अधिकारी करत आहेत. असेही ते पुढे म्हणाले.