
भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका !
संपूर्ण मराठवाड्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. लोकांची घरे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. पिकांसह शेतीतील मातीही वाहून गेली आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
सरकारने एकरी ५० हजारांची मदत करावी अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यालाच आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटलं की, मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उद्ध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा…त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो किंवा मग राज्य सरकार असो. प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का? बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये टाकले. बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान केले, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर केली होती.