
भारत-पाक सामन्यावर आदित्य ठाकरेंचा संताप !
भारतीय संघाने आशिया चषक 2025 स्पर्धेत पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा धूळ चारत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महत्त्वाचे म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने आले होते.
त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवले टाळले. तसेच पाक खेळाडूंनी मैदानात केलेल्या टीकेलाही भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अशातच अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. मात्र आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींवरही टीका केली.
कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादव मोहसीन नक्वीशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. मात्र भारतीय संघाने विजयानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हस्तांदोलन करणे किंवा न करणे, तसेच ट्रॉफी स्वीकारणे किंवा न स्वीकारणे ही सर्व नौटंकी आहे. खरं तर आपण पाकिस्तानसोबत खेळण्याची गरज नव्हती. कारण पाकिस्तानने हॉकी आशिया चषकसाठी बिहारमध्ये येण्यास नकार दिला होता, त्यामुळे आपण सुद्धा पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकलो नसतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ऑपरेशन सिंदूर का घडले? असा प्रश्न विचारतानाच आदित्य ठाकरे म्हणाले की, पहलगाममध्ये आपले भारतीय नागरिक मारले गेले, म्हणून ऑपरेशन सिंदूर घडले. तसेच भाजपा असा दावाही करते की, पहलगाममध्ये हिंदू असल्यानेच नागरिकांना मारण्यात आले. एकीकडे, विचार करा की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना बीसीसीआयने त्यांना येथे आमंत्रित केले आणि बांगलादेशसोबत मालिका खेळली होती. त्याच भारत सरकारने बांगलादेशला तांदूळ आणि धान्य पाठवले होते. दरम्यान, या वर्षी पहलगाममध्ये हल्ला झाला, ज्यामध्ये हिंदूंची हत्या झाली. असे असूनही, भारत आज पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे. हे का होत आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
भाजपावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपा आपल्याला देशभक्ती शिकवणार, परंतु खेळापासून मागे हटणार नाही. आपल्या सैनिकांचे शहीद होणे क्रिकेटपेक्षा मोठे आहे का? या गोष्टीचा विचार होण्याची गरज आहे. क्रिकेट हा खेळ आहे आणि तो चालूच राहणार आहे. पण पहलगामच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत आणि तुम्हाला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे आहे, कारण तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. याचवेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान मोदी क्रिकेटची तुलना ऑपरेशन सिंदूशी करत आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले की, माझ्या मते हे दुर्दैव आहे. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिक शहीद झाले. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांच्या सामर्थ्याचा समावेश आहे. असे असतानाही ऑपरेशन सिंदूरची तुलना खेळाशी केली जात आहे, हे खरंच दुर्दैव आहे.