
इगतपुरी प्रतिनिधी – विकास पुणेकर
इगतपुरी – 20 सप्टेंबर 2025 रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल, इगतपुरी येथे आज 3 ते 6 वयोगटातील चिमुकल्यांसाठी ‘लिटिल इंजिनिअर्स विथ ओरिगामी’ हा अनोखा आणि सर्जनशील उपक्रम पार पडला. या उपक्रमाद्वारे लहान मुलांना कागदाच्या घड्यांद्वारे नवीन गोष्टी तयार करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने एक सुंदर ‘ओरिगामी शहर’ साकारले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री. संदेश खताळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सौ. प्रणाली घाईतडके यांच्या संयोजनात करण्यात आले. लहानग्यांनी विविध रंगीत कागदांपासून घरे, झाडे, वाहने, प्राणी यासारख्या अनेक वस्तू बनवून आपले छोटे शहर साकारले. प्रत्येक घड्यांमध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि हातोटीचा सुरेख संगम दिसून आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उपस्थित पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि मुलांच्या सर्जनशीलतेस चालना दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.