
जनता म्हणते…
महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला. अशामध्ये एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पाहणी दौरे केले, तर दुसरीकडे पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
अशामध्ये आता भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा सामना पाहायला मिळत आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंनी यांनी दौरा करत पूरग्रस्तांना भेट दिली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली. त्यानंतर भाजपने, ‘दसरा मेळावा रद्द करून तो पैसा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्यात यावा,’ असा सल्ला शिवसेना उबाठाला दिला. त्यानंतर शिवसेना उबाठानेही प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करुन, तो खर्च मराठावड्यातील पूरग्रस्तांना द्यावा, भाजपचा हा सल्ला योग्य वाटतो का? असा प्रश्न सामान्य जनतेला विचारण्यात आला. यावरून अनेकांनी शिवसेना उबाठाला पाठींबा देत भाजपवर टीका केली आहे. एका युझरने म्हटले की, दसरा मेळावा हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केला. त्यामुळे तो चालू राहणारच आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, एका युझरने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला असे करण्यास भाजपने सांगावे असा सल्ला दिला आहे. तसेच, काहींनी भाजपपुरस्कृत गरबा कार्यक्रम रद्द करून तो पैसा पूरग्रस्तांसाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे. एका युझरने म्हटले की, “महाराष्ट्राचे व्यवस्थापन करण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे,” असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. तसेच, एका युझरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दसरा मेळावाचा कार्यक्रम रद्द करावा, असा सल्ला दिला आहे. तसेच, एकाने पंतप्रधान मोदींचे दौरे रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, यंदाच्या पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या काळात शिवसेना उबाठाने दसरा मेळावा न घेता तो पैसा मराठावड्यातील पूरग्रस्तांना द्यावा, असा सल्ला दिला. तर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन मेळावा घेण्याचा सल्ला शिवसेना उबाठाला दिला. यावर शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचे ज्ञान घेण्याची गरज नाही. दसरा मेळावा रद्द होणार नाही, असे म्हणत भाजपचा सल्ला धुडकावून लावला. तर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजप नेते आम्हाला सल्ला देत आहेत. ते हाच सल्ला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला का देत नाही?चंद्रकांत पाटील आणि उपाध्ये यांनी त्यांचा प्रस्ताव एकदा संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे ठेवावा, असे म्हणत टीका केली