
अमेरिकेची वाढली डोकेदुखी; या राज्यातून थेट…
भारतासाठी अमेरिकेची बाजारपेठ अत्यंत मोठी आणि महत्वाची राहिली आहे. भारतीय व्यापारी अमेरिकेच्या बाजारपेठेत आपल्या वस्तूंची निर्यात करून कोट्यावधी रूपये कमावत होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर मोठा धक्का बसला आणि अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली.
मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने नफा अत्यंत कमी झाला असून वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत पाठवणे व्यापाऱ्यांना अवघड झालंय. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका मोठा टॅरिफ भारतावर लावण्याचा निर्णय घेतला. या टॅरिफच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा देखील बंद होती. वरिष्ठ पातळीवर टॅरिफ कमी करण्याबद्दल चर्चा सुरू असतानाच पंजाबच्या व्यापाऱ्यांनी टॅरिफच्या निर्णयानंतर आपले होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोठी शक्कल लढवली आहे.
अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेतही उत्पादने महाग झाली आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे केवळ भारतीयांचेच नाही तर अमेरिकन व्यवसायांचेही मोठे नुकसान होत आहे. भारतीय उत्पादने टॅरिफमुळे महाग झाल्याने ग्राहक त्यांच्यापासून दूर जातील, ही चिंता अमेरिकन व्यापाऱ्यांना जितकी आहे तितकीच भारतीय व्यापाऱ्यांना देखील. यावरून आता थेट मार्ग काढण्यात आलाय.
पंजाब आणि अमेरिकन व्यापारी एका तात्पुरत्या करारावर सध्या काम करत आहेत. या करारानुसार, पंजाबचे व्यापारी टॅरिफ वाढीमुळे महाग झालेल्या उत्पादनांवर तीन महिन्यांसाठी तब्बल 10 ते 15 टक्के सूट देतील तर उर्वरित भार अमेरिकन व्यापारी उचलतील आणि ते देखील ग्राहकांना मोठी सूट देतील, जेने करून ग्राहकांना ती वस्तू अगोदरच्याच भावात मिळेल आणि ते वस्तूंपासून किमान दूर जाणार नाहीत.
सध्या टॅरिफमुळे वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झालीये. अमेरिकन ग्राहक सवलत मागत आहेत. त्यामधून दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांनी मार्ग काढत अर्धा अर्धा भाग उचलण्याचा निर्णय घेतलाय. या काळात जर टॅरिफमध्ये काही बदल झाला तर परत अगोदरप्रमाणेच दोन्हीकडील व्यापारी व्यापार करतील. टॅरिफमुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. पंजाबमधून मोठ्या प्रमाणात अमेरिकेत इलेक्ट्रिकल मशिन टूल, ऑटो पार्ट्स, चामड्याच्या वस्तू, कृषी साधणे, रिधान, फास्टनर जाते.