
सूर्यादादाच्या उत्तराने पाकिस्तानी पत्रकाराच्या जखमांवर चोळलं मीठ; कर्णधाराला नाव ठेवणं पडलं महागात…
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ चे जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत या स्पर्धेचं जेतेपद नवव्यांदा आपल्या नावे केलं.
पण भारतीय संघाने विजयानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला आणि अखेरीस भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारलीच नाही. यानंतर भारताने विजयाचं मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केलं आणि सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी हजर राहिला. यादरम्यान पाकिस्तानच्या पत्रकाराला सूर्याने भन्नाट उत्तर दिलं आहे.
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावलेल्या अभिषेक शर्मासह पत्रकार परिषदेला हजेरी लावली. या पत्रकार परिषदेदरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारत असलेल्या प्रश्नापेक्षा संघाच्या पराभवाचं दु:ख आणि राग त्यांच्या बोलण्यातून दिसत होता. सूर्याने त्यांना उपप्रश्न करत बोलतीच बंद केली.
सूर्यकुमार यादवला पाकिस्तानी पत्रकाराने नेमका काय प्रश्न विचारला?
पाकिस्तानच्या पत्रकाराने पत्रकार परिषदेत हस्तांदोलन, ट्रॉफीसह फोटो न काढणं आणि राजकारणात खेळामध्ये आणणं यासारख्या गोष्टींची यादी करताना सूर्यकुमार यादवला विचारण्यात आलं की, “तुम्ही पाकिस्तानी संघाबरोबर असे का वागलात? क्रिकेटमध्ये राजकारण आणणारे तुम्ही पहिले कर्णधार आहात असे तुम्हाला वाटत नाही का?
सूर्यकुमार यादव सुरूवातील हसला आणि नंतर त्याने उत्तर दिलं. पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देण्याआधी तर सूर्याने विचारलं की या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे का, यावर बीसीसीआयमधील जे व्यक्ती तिथे हजर होते; त्यांनी नाही असं सांगितलं. तितक्यात सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी पत्रकाराला विचारलं, “तुम्हाला राग आला आहे का?” आणि सूर्यासह सर्वच जण हसू लागले. त्यानंतर पुढे सूर्या म्हणाला, “तुम्ही एकाच वेळी इतक्या गोष्टी विचारल्या की मला तुमचा प्रश्नच समजला नाही.
सूर्यकुमार यादवने या प्रश्नाला उत्तर देताना परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवसाठी आशिया चषक २०२५ ही स्पर्धा खूप मोठी होती आणि त्याने या स्पर्धेत संघाचं नेतृत्त्व करताना चांगली कामगिरी केली. यासह सूर्याने कर्णधार म्हणून पहिलं जेतेपद पटकावलं आहे.