
भारताच्या रिंकू हुडा याने ‘एफ ४६’ विभागातील भालाफेक प्रकारात ६६.३७ मीटर कामगिरी करून पॅरा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील आपले पहिले सुवर्णपदक मिळविले. याच स्पर्धेत पुरुषांच्या ‘एफ ५६’ विभागात थाळीफेक प्रकारात भारताचा योगेश कथुनिया रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
थाळीफेकीत २८ वर्षीय कथुनिया याने दुसऱ्या प्रयत्नात ४२.४९ मीटरची कामगिरी करताना रुपेरी यश मिळवले. कथुनिया २०१९ पासून चारही जागतिक स्पर्धेत पदक जिंकत आहे. हे त्याचे सलग तिसरे रौप्यपदक आहे. यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्येही त्याने अशीच कामगिरी केली होती. त्याआधी २०१९च्या स्पर्धेत पदार्पणात तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. कथुनियाने २०२१ आणि २०२४ पॅरालिम्पिक, तर २०२३ पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही रौप्यपदक मिळविले आहे.
ब्राझिलच्या जागतिक विक्रमवीर क्लॉडिनी बटिस्टाने ४५.६७ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. त्याचे सर्वच सहा प्रयत्न कथुनियाच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा सरस होते. त्याचे हे सलग चौथे जागतिक सुवर्णपदक ठरले. बटिस्टाने सलग तीन पॅरालिम्पिक स्पर्धेतही असेच सोनेरी यश मिळविले आहे.
बटिस्टाला हरविण्यात पुन्हा अपयशी ठरलो असलो, तरी घरच्या मैदानावर मिळविलेल्या यशाने खूप आनंदी आहे. माझी कामगिरी बघण्यासाठी कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांचा नेहमीच मला पाठिंबा असतो. त्यामुळे त्यांच्यासमोर मिळविलेले रौप्यपदक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंद देणारे आहे,” अशी प्रतिक्रिया कथुनिया याने व्यक्त केली.
पुरुषांच्या ‘टी ४४’ विभागातील पुरुषांच्या १०० मीटर स्पर्धा प्रकारात सौदी अरेबियाच्या नैफ अलमसराहीने १०.९४ सेकंद वेळ देत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ‘टी ३५’ विभागातील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तटस्थ खेळाडू डेव्हिड झातिएव्ह, ‘टी २०’ विभागातील पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत स्पेनच्या डेव्हिड मेजिया आणि ‘टी ५४’ विभागात पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ट्युनिशियाचा यासिन घरबी यांनी स्पर्धा विक्रमांची नोंद केली.
विक्रमवीराला मागे टाकत सोनेरी यश
रिंकू हुडा याने ‘एफ ४६’ विभागातील भालाफेक प्रकारात ६६.३७ मीटर कामगिरीसह पहिले जागतिक सुवर्णपदक मिळवले. त्याने भारतीय सहकारी आणि जागतिक विक्रमवीर सुंदर सिंग गुर्जरला (६४.७६ मीटर) मागे टाकले. क्युबाच्या गिलेर्मो गोन्झालेझने ६३.३४ मीटर कामगिरीसह कांस्यपदक मिळविले. ”मायदेशातील ही माझी पहिलीच स्पर्धा आहे. सुवर्णयशामुळे मला खूप आनंद झाला आहे. आज माझा दिवस होता. सर्वकाही माझ्याबाजूने घडत होते, असे रिंकू म्हणाला.