
जयंत पाटील सिनियर लिडर; त्यांनी मंत्रिपद…
गेल्या काही दिवसापासून पातळी सोडून टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घरसली. सांगली येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली. तसेच जयंत पाटील यांचे एकेरी नाव घेत जयंत्या असा उल्लेख केला. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते पडळकरांवर जोरदार टीका करताना दिसत असतानाच महायुतीतील मित्र पक्ष शिवसेनेतून देखील टीका होताना दिसत आहे.
गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केल्याने राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी जोरदार निशाना साधला आहे. सतेज पाटील यांनी तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की पडळकर यांना तंबी देलीय का? असा सवाल उपस्थित केला आहे. या टीकेवरून आता भाजपला देखील स्पष्टीकरण द्यावे लागले असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी, पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना राजारामबापू यांचे नाव घेतले. त्यांच्या या टीकेचे मीच काय तर आम्हीच कोणीच समर्थन करत नाही. टीका ही वैचारीक आणि तत्वाशी संबंधित असावी. जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणातील जेष्ठ नेते असून त्यांनी अनेकदा राज्यात महत्वाचे मंत्रिपद भूषविले आहे. जरी ते विरोधी पक्षातले असलेतरी त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
वैचारिक मतभेद असू शकतात. पण अशा पद्धतीने जहरी टीका करणे योग्य नाही. जरी तो आमच्या पक्षातला असला तरीही. असेच म्हणणे एकनाथ शिंदे साहेबांचेही आहे. त्यामुळे पडळकर यांनी जी टीका केली आहे, ती अयोग्य असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उदय सामंत यांनी, ठाकरे यांचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. त्यांनी, आमचा दसरा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचाच आहे. विचारांचे सोनं घेवून जावं हीच त्यांची शिकवण आणि संकल्पना होती. आता त्यांचे विचार कोण पुढे नेत आहे. हे राज्यातील जनता जानते.
तर बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेससोबत जाऊ नका असा होता. कोण गेलं? त्यांनी खुर्ची घेतली. पण आम्ही काँग्रेससोबत फारकत घेतली. आम्ही बाळासाहेब यांच्या विचाराप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आहोत. यामुळेच काल शिंदे साहेब यांनी जाहीर केले की आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार नाही. जेथे जेथे पूरामुळे नुकसान झाले आहे. तेथील एकाही शिवसैनिकाने मेळाव्याला येवू नये अशा सूचना दिल्या आहेत.
तसेच शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूरामुळे नुकसान झालेल्या ठिकाणनी जावून दसरा साजरा करण्याच्या सूचना आहेत. हे सामाजिक काम आहे. त्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच सोडले आहेत. त्यांची दखल घ्यायची आम्हाला गरज नाही. त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर नेवून ठेवलेला धनुष्यबाणही आम्हीच सोडवून आणला असाही हल्लाबोल उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केला आहे.