
फडणवीसांनी काही तासांतच हिशेब चुकता केला…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी काही तासांतच प्रत्युत्तर देत ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरूवातीलाच ठाकरेंचे आभार मानले. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन, की त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की, ठाकरेंच्या भाषणामध्ये विकासासंदर्भात एक मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा.
काल मी तर त्यांचं भाषण काही ऐकलं नाही. मी ज्यांनी भाषण ऐकलं, त्यांना विचारलं की, मला एक हजार रुपयांचा फटका आहे का, उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का, अख्ख्या भाषणात विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत. त्यांचे बोलणं म्हणजे स्वगत असतं. यावेळी तर पुढे माणसंही नव्हती, अशी स्थिती होती. पण त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.
ठाकरेंनी नेहमीच्या पध्दतीने लोकांसंदर्भात, विकासासंदर्भात, लोककल्याण, बीएमसीला, राज्याला पुढे कसे नेणार, याबाबत अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवले आणि माझे हजार रुपये वाचवले, त्याबद्दल आभार मानतो, अशी खिल्ली उडवत फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केले.
भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करत आहे, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, एखादा व्यक्ती निराश झाला की तो अद्वातद्वा बोलत असतो. सुज्ञ लोकांनी त्यावर बोलायचे नसते. त्याची मानसिकता बघून सोडून द्यायचे असते, असा टोला फडणवीसांनी लगावला. विरोधी पक्षाने सत्तेत असताना अशाप्रकारच्या आपत्तीमध्ये त्यांनी काय निर्णय घेतले, काय जीआर काढले, याबाबत त्यांनीच आरसा बघावा, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी अतिवृष्टीच्या मदतीबाबत विरोधकांकडून सुरू असलेला टीकेला दिले.