
ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा…
आज मुख्यमंत्री काही जातीच्या (ओबीसी)लोकांची बैठक घेत असल्याचे कळले. मात्र या जातीवादी लोकांचे ऐकू नये. मराठ्यांच्या आरक्षणाला फाटा बसेल असे असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, इतकीच आमची इच्छा आहे, नसता पूढचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षणाविरोधात सतत भूमिका घेत आहे. मात्र त्यांचे कोण ऐकतो, वडेट्टीवार हे लाभार्थी टोळीतील आहे. मुख्यमंत्र्यांनाही यांचे धंदे काय हे माहिती असल्याचे जरांगे म्हणाले. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी तुम्हाला १९९४ चा जी.आर. रद्द करण्याच्या मागणीवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला, याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले की, १९९४ चा जी.आर. रद्द करण्याची आमची मागणी आहे. मंडल कमिशनमध्ये ज्या जाती टाकल्या त्या बाहेर काढा कारण सध्या जशास तशी फाईट आहे.
‘ते’ केवळ जातीचे नेते
आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते नाही तर ते त्या त्या जातीचे नेते असल्याचे जरांगे यांनी नमूद केले. तो काँग्रेस नेता आहे कुठल्या जातीचा त्याचा मेळ नाही, छगन भुजबळ काही माळ्यांचा नेता असल्याचे ते म्हणाले. दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
जालना; छत्रपती संभाजीनगरमधील २ लाख कुणबी कुठे गेले?
छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता. तेव्हा येथे २ लाख कुणबी होते. ते आता कुठं गायब झाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगावे. ही परिस्थिती सगळ्याच जिल्ह्यात असल्याचे ते म्हणाले. हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी समाजाची जी संख्या आहे , तेच आजचे मराठे आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा तुमच्या नरड्यावर येईल, बहाणे सांगू नका असा दमही त्यांनी दिला.