
हेचि फळ काय मम तपाला ?
शिर्डी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाचा मार्ग माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पुढं जातो. त्यामुळे त्यांच्या ‘गुडबुक’मध्ये जाण्यासाठी गेल्या चारवर्षांपासून अनेकांची राजकीय धडपड सुरू होती.
ती आता थांबणार आहे.
शिर्डी नगरपंचायतीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरलं आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे समजताच, सर्व संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर, ‘हेचि फळ काय मम तपाला?’, असे म्हणण्याची वेळ आली.
शिर्डी म्हणजे, बडे हाॅटेल मालक आणि उद्योजकांची रेलेचेल, हे शहरातील स्थानिक राजकारणाचे प्रमुख वैशिष्ट! गेल्या चार वर्षांपासून त्यातील अनेकांनी नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार तयारी केली. गरज पडेल तिथं काहींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. कुणी फ्लेक्सवर चमकण्यात सातत्य ठेवले. कुणी जनतेचे कैवारी, या नात्याने निवेदने आणि आंदोलनांचे इशारे देण्यात धन्यता मानली. पण, आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचे मनसुब्यांवर पाणी फिरलं आहे.
गेल्या चार वर्षात या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य दावेदारांनी शिर्डी (Shirdi) अक्षरशः गाजवली. क्रिकेटच्या स्पर्धा पासून ते गणपती उत्सवापर्यंत आणि हळदी कुंकवांच्या कार्यक्रमांपासून सर्वरोग निदान शिबिरांपर्यंत कुठलाही उपक्रम असो, त्याचे प्रायोजकत्व स्विकारण्यास या मंडळींनी कधी कसूर केली नाही. शिर्डी बाजारपेठेचा आणि साईसंस्थानच्या निर्णयांचा जेथे कोठे संबंध आला, त्यावेळी निवेदने आणि शिष्टमंडळे नेऊन आंदोलनाचे इशारे देण्यात मागेपुढे पाहिले नाही.
पालिकेतील सत्तेच्या चाव्या माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करण्याची स्पर्धा सुरू होती. महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना त्यांना निमंत्रित करून शक्तिप्रदर्शन केले जात होते. त्यांच्या ‘गुड बुक’मध्ये जाण्यासाठी शक्य होईल ते सर्व करण्याची चढाओढ सुरू होती.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, रमेश गोंदकर आणि छोटे बापू या नावाने प्रसिध्द असलेले दत्तात्रय कोते यांच्यापासून युवकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला नगराध्यक्षपदाची आस लागली होती.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली या स्थानीक नेत्यांची धावाधाव आजच्या सोडतीनंतर अक्षरशः थंडावली. तथापी महायुती आणि महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारी मिळवीण्यासाठी देखील रस्सीखेच ठरलेली आहे. फरक एवढाच की खुल्या प्रवर्गातील काही दिग्गजांची तयारी अक्षरशः वाया गेली.