
मनोज जरांगे पाटील यांचा सवाल; अंगावर आला तर सोडणार नाही…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील हे भडकावू भाषण करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली. यावर तलवारी, कोयते काढण्याची भाषा कोणी केली? आमच्यावर अन्याय करणार असाल, अंगावर येणार असाल तर सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय आणि त्यासंदर्भातला जीआर काढल्यापासून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष भडकला आहे. गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी सूरू केली आहे. लवकरच ओबीसींचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध सुरू झाल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेली भाषा ओबीसी नेत्यांना खटकली. त्यांनतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, कायदेशीवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता बबनराव तायवाडे यांनीही जरांगे यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या सगळ्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या मुळावर उठले आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या जीआरला विरोध करण्यासाठी हे कोर्टात जातात. या आधीचे नारायण राणेंनी दिलेले 16 टक्के, त्यानंतरचे 13 टक्के आणि आताचे दहा टक्के अशा तीनही वेळा मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींचे नेते कोर्टात गेले. छगन भुजबळ यांनी मी सात याचिका दाखल केल्याचे जाहीरपणे सांगीतले.
मग त्यांनी कायम आमच्या विरोधात जायचे आणि आम्ही मात्र संबंध जपत बसायचे, हे यापुढे चालणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल, मराठा आरक्षणाला विरोध करणार असाल तर आम्ही 1994 चा जीआर आणि पन्नास टक्क्यांच्यावर असलेल्या दोन टक्के आरक्षणाला विरोध करणार आणि ते रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उद्याच मी रुग्णालयातून सुट्टी घेऊन दिल्लीत जाणार आहे. मुंबईतील तज्ञ वकील आणि सुप्रीम कोर्टातील बड्या वकीलांशी चर्चा करून या दोन्ही जीआरला कसे चॅलेंज करता येईल? हे पाहणार आहे.
सरकारकडूनही आतापर्यंत ज्या जाती आरक्षणात टाकल्या, त्याचे निकष काय, मागसवर्ग आयोगाचा अहवाल या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने तपासणार आहोत. याची सगळी माहिती आपण सरकारला मागितली आहे. मराठा समाजाने वेळोवेळी जर यांना विरोध केला असता तर ही वेळ आज आली नसती. मराठा समाजाला आरक्षण न दिल्याचा पश्चाताप शरद पवारांनाही आज होत असेल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांनी गप्प बसायचं नाही..
छगन भुजबळ, वडेट्टीवार हे नेते मराठ्यांच्या विरोधात बोलतात. कोयते, तलवारी काढण्याची भाषा कोणी केली होती? मग आम्ही शांत बसायचं का? मतांसाठी, दहा-पाच रुपयांसाठी नेत्यांची लाचारी करू नका, दहा हजारांच्या मतांनी आपलं काही बिघडतं नाही, पण त्यासाठी मराठा नेत्यांनी परळीच्या टोळक्यांची लाचारी तर करूच नाही. आपण पंचावन्न टक्के आहोत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. कुठे मराठा समाजाच्या पोरांच भलं होऊ लागलं तर यांची पोट दुखायला लागलीत. इतकी वर्ष आमच्या हक्कांच खाल्लं आम्ही विरोध केला का? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.