
राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे राज्यातील शेकऱ्यांचे लक्ष लागले होते. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या खात्यावर मदत जमा होईल अशी अपेक्षा होती, दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिलेले असताना आता राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदतीचं पॅकेज जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मदतीच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. ते म्हणाले सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती ती पुर्ण झाली नाही, ती कधी करणार? तसेच, केंद्राने मदत केली आहे का ? असा प्रश्न विचारत वडेट्टीवार यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडास पाणी पुसले आहे, अशी टीका केली.