
सवता सुभा मांडत केली ‘ही’ मोठी घोषणा !
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश करून संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली.
मात्र, या निवडणुकीत देखील संजय काका पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
पराभवानंतर भाजपमध्ये घरवापसीची चर्चा सुरू असतानाच नाराज झालेल्या संजय काका पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता महायुतीलाच धक्का दिला आहे. तासगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ‘ना भाजप ना राष्ट्रवादी’ कार्यकर्ताच हा माझा पक्ष अशी घोषणा करत सवता सुभा मांडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांनी एकला चलो चा नारा दिल्याचं दिसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची तासगाव येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोलताना पाटील यांनी, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर इथंपर्यंत आलो, माझ्यासाठी कार्यकर्ता हाच पक्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोणताही पक्ष नाही, कोणताही झेंडा नाही. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, अशी घोषणा माजी संजय पाटील यांनी केली.
आगामी स्थानिकच्या निवडणुकीत एकला चलो चा नारा देत या निवडणुका विकास आघाडी यांच्यामार्फत लढवण्याचे देखील संकेत दिले. ”ज्यांच्यामुळे आमदार, खासदार झालो, त्या कार्यकर्त्यांशी कधीही प्रतारणा करणार नाही. सत्तेत असताना नीती, न्यायाने वागलो, भ्रष्टाचार अन्याय यापासून दूर राहिलो. सामंजस्याची भूमिका घेतली. याचा अर्थ मी कमी आहे, असे नाही. कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या निवडणुकांसाठी निवडणुकीपेक्षा अधिक ताकदीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे. असेही ते म्हणाले. ‘जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचा ताळमेळ कोणाला नाही. कोण काय बोलतोय, याचे कोणालाच भान नाही. माझी घुसमट होत आहे. त्यामुळे कार्यकर्ता हाच माझ्यासाठी पक्ष आहे. ही लढाई पूर्ण ताकतीने लढू या, असे आवाहन त्यांनी केले.
कोणताच झेंडा नाही
या मेळाव्यासाठी तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रताप पाटील हेही बैठकीस आवर्जून उपस्थित होते. बैठकीच्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा अथवा कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे छायाचित्र नव्हते. माजी खासदार संजय पाटील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढले होते. लोकसभा भाजपकडून लढले होते. मात्र या मेळाव्यात कोणताच झेंडा न वापरल्याने त्याची चर्चा बैठकीदरम्यान सुरू होती.