
प्रताप पाटील चिखलीकर थांबेनात !
भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याशी प्रताप पाटील चिखलीकर जुळवून घेतील असे वाटले होते. पण लोकसभेतील पराभवाचे खापर चव्हाण यांच्या माथी फोडत चिखलीकरांनी आपला मार्गच बदलला. लोहा-कंधारमधून आमदार होण्यासाठी केलेले सीमोल्लंघन यशस्वी ठरल्यानंतर चिखलीकर चांगलेच आक्रमक झाले आहे. महायुती असली तरी स्थानिक पातळीवर अशोक चव्हाण यांना वरचढ होऊ द्यायचे नाही, यासाठी चिखलीकरांनी कंबर कसली आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नांदेडमधील पथसंचलनावर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फुलं उधळली, यावरून प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘अशोक चव्हाण तुमची हालत काय झाली? ते पहा’ असा टोला लगावला. दसऱ्याच्या रावण दहन कार्यक्रमापासून सुरू झालेला टीकेचा सिलसिला आता स्थानिक स्वराज्य निवडणुका होईपर्यंत काही थांबणार नाही असे दिसते. कधीकाळी अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वात राजकाणाचा श्रीगणेशा केलेल्या चिखलीकर यांनी आता थेट त्यांनाच आव्हान दिले आहे.
दोघेही भाजपमध्ये असताना लोकसभेला पराभूत होऊनही केवळ वरिष्ठांच्या दबावामुळे चिखलीकर शांत होते. अशोक चव्हाण यांच्याविरोधात न बोलण्याची तंबी त्यांना देण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमदार झाल्यानंतर चिखलीकर आता चव्हाणांवर तुटून पडले आहेत. मांजरा साखर उद्योग समुहाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या भावावरून सर्वप्रथम अशोक चव्हाण यांना चिखलीकरांनी टार्गेट केले.
यावर आधी कलंबर कारखाना सुरू करून दाखवा, अशा मोजक्या शब्दात अशोक चव्हाणांनी प्रताप पाटालांना सुनावले. त्यानंतर चिखलीकरांनी सातत्याने अशोक चव्हाण यांच्यावर टीका सुरू केली. गेली 50 वर्षे नांदेडमधील जनता तुमच्यावर फुलं उधळत होती. मात्र, आता तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागत आहेत. अशोक चव्हाण यांची हालत काय झाली पाहा, असे म्हणत डिवचले.
तुम्ही ज्यांच्या जिवावर 50 वर्षे राज्य केले, जे लोक पहिले तुमच्याकडे येत होते, ते आज कुठे आहेत ते पाहा. येथील जनतेने 50 वर्षे तुमच्यावर फुलं उधळली. आता तुम्हाला आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागत आहेत. यापुढे अशोक चव्हाण तुमच्याकडे मत मागायला येऊ शकत नाहीत. इथून पुढे तुमची सगळी मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्या, तुमची सगळी जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपस्थितांना दिली.
अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आधी चिखलीकर भाजपमध्ये तर चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते. तेव्हा हे दोघेही एकमेकांवर नेहमीच तोंडसुख घ्यायचे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधी अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने चिखलीकर अस्वस्थ झाले, पण लोकसभा निवडणुक तोंडावर असल्याने त्यांनी इच्छा नसताना अशोक चव्हाण यांच्यासोबत स्टेजवर हजेरी लावली.
तलवार म्यानातून बाहेर..
अशोक चव्हाणांची लोकसभेला मदत होईल आणि आपण निवडून येऊ, अशी आशा चिखलीकर बाळगून होते. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने नांदेडसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वच जिल्ह्यात महायुतीचा सफाया झाला. चिखलीकरांनी पराभवाचे खापर अशोक चव्हाण यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला, पण वरिष्ठांकडून डोळे वटारताच ते शांत झाले. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, याची प्रचिती सात-आठ महिन्यातच आली.
प्रताप पाटील चिखलीकरांनी भाजपाचे कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधून घेतले. लोहा-कंधारमधून विजय मिळाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सगळी सुत्रं चिखलीकर यांच्या हाती आली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष एक नंबरचा करायचा निर्धार त्यांनी केला आहे. अजित पवारांचेही त्यांना पाठबळ असल्याने चिखलीकरांनी आता थेट अशोक चव्हाण यांनाच अंगावर घेतले आहे. पुढील काळात अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील संघर्ष अधिकच उफाळून येणार आहे.