
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली असून राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांचा थेट या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. नाशिक पोलिसांनी आता या गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी कंबर कसली आहे.
पोलिसांकडून अटकेचा धडाका सुरु आहे.
नाशिकच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी भाजपचे मामा राजवाडे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये येण्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली.
या गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे यांची नाशिक गुन्हे शाखेने तब्बल 15 तास कसून चौकशी केली आणि अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान मामा राजवाडे यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात हजर करण्यापूर्वी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’, असे नाशिक पोलिसांनी मामा राजवाडेंकडून वदवून घेतले.
काल सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आरपीआयचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांकडून देखील काल पोलिसांनी नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले होते. नाशिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ जिल्हाभरात व्हायरल झाला होता. त्यातून नाशिकमध्ये गुन्हेगारीला थारा नसून कायद्याचे राज्य आहे असा संदेश देण्यात आला. नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या हे प्रकरण चर्चेत आहे.
गंगापूर रोडवरील विसे मळा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचे नेते सुनील बागुल यांचे पुतणे सागर बागुल व गौरव बागुल यांना अटक झाली आहे. या पाठोपाठ बागुल यांचा निकटवर्तीय असलेल्या मामा राजवाडे यांनाही अटक झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. जुन्या वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणातील सूत्रधार अजय बागूल व इतर फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सचिन अरुण साळुंके (२८, रा. राणेनगर) याच्यावर गेल्या २९ सप्टेंबरला पहाटे विसे मळ्यात गावठी कट्ट्यातून गोळी झाडली होती. त्यानंतर त्याचे अपहरण करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सरकारवाडा पोलिसांत सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे, अजय बोरिसा, अजय बागूल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धने, गोपाल दायमासह अज्ञात संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.