
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे सात दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर) परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतली. बैठकीनंतर मुत्ताकी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिदेला महिला पत्रकारांना प्रवेश दिला गेला नाही, असा आरोप करत काँग्रेसला सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अधिकृत सूत्रांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “शुक्रवारी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचा कोणताही सहभाग नव्हता.”
मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेवरुन वाद
मुत्ताकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये महिला पत्रकारांना अफगाण दूतावासात येण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले प्रश्न
प्रियांका गांधींनीही या घटनेला “भारतातील सक्षम महिलांचा अपमान” म्हटले. काँग्रेस सरचिटणीसांनी एका पोस्टमध्ये विचारले की, जर पंतप्रधानांनी महिलांच्या हक्कांना दिलेली मान्यता ही निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत केवळ एक प्रकारची झलक नाही, तर “आपल्या देशातील सक्षम महिलांचा अनादर” कसा होऊ दिला गेला?
काबूलमध्ये अफगाण नागरिक रस्त्यावर, तालिबान्यांचा गोळीबार
पुरुष पत्रकारांनी ‘पीसी’वर बहिष्कार टाकायला हवा होता : चिदंबरम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलें आहे की, “मला आश्चर्य वाटते की अफगाणिस्तानचे मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांचा समावेश नव्हता. माझ्या वैयक्तिक मते, जेव्हा पुरुष पत्रकारांना कळले की त्यांच्या महिला सहकाऱ्यांना समाविष्ट (किंवा आमंत्रित) केले गेले नाही, तेव्हा त्यांनी बाहेर पडायला हवे होते.
अफगाण विद्यार्थ्यांसोबत राज्यसरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील
मुत्ताकी नव्हे भारत सरकार जबाबदार : रशीद अल्वी
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, “पंतप्रधान ट्रम्प आणि चीनसमोर झुकतील हे समजण्यासारखे आहे, परंतु भारत सरकार अमीर खान मुत्ताकीसमोर झुकेल, जे महिलांना पत्रकार परिषदेत उपस्थित राहू देत नाहीत. या संपूर्ण प्रकरणी अमीर खान मुत्ताकी जबाबदार नाहीत तर भारत सरकार जबाबदार आहे
पत्रकार परिषदेत सहभाग नसल्याची परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती
शुक्रवारी दिल्लीत तालिबानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळल्याबद्दल बाबात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. याबाबत आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, “काल दिल्लीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचा कोणताही सहभाग नव्हता.”
तालिबानचे मंत्री आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर
तालिबानचे मंत्री ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काबूलहून भारताला भेट देणारे हे पहिलेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. त्यांच्या भेटीच्या पहिल्या दिवशी, मुत्ताकी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांवर चर्चा केली.