
अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल !
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे शुक्रवारी(दि.10) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होऊ दिले नव्हते.
यावरुन देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दात टीका केली. “जेव्हा पंतप्रधान अशा भेदभावावर मौन बाळगतात, तेव्हा ते देशभरातील महिलांबद्दल कमकुवतपणा आणि असंवेदनशीलतेचा संदेश देतात,” अशी टीका राहुल यांनी केली..
राहुल गांधींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, मिस्टर मोदी, जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक कार्यक्रमातून वगळण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही देशातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की, तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहण्यास दुबळे/असमर्थ आहात. आपल्या देशात महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान सहभाग घेण्याचा अधिकार आहे. अशा भेदभावावर तुमचे मौन, तुमच्याच ‘महिला शक्ती’च्या घोषणांचा पोकळपणा उघड करते,” अशी टीका राहुल गांधींनी केली.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीदेखील यावरुन सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पीएम मोदी जी, कृपया तुम्ही स्पष्टीकरण द्यावे की, महिला पत्रकारांना तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून का वगळण्यात आले? महिला हक्कांचे तुमचे दावे फक्त निवडणूक घोषणा आहेत का? टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी याला प्रत्येक भारतीय महिलेचा अपमान म्हटले.
परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केले आहे की, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा कोणताही सहभाग किंवा भूमिका नव्हती. या पत्रकार संवादातून महिला पत्रकारांना वगळणे हा MEA चा निर्णय नव्हता. अफगाणिस्तानने त्यांच्या दूतावासाच्या परिसरात स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले.