
सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय 50 नगरसेवकपदांसाठीची आरक्षण सोडत झाली. या सोडतीनंतर शहरातील चौकाचौकांमध्ये कोणाच्या प्रभागात कोणते आरक्षण पडले, याचीच चर्चा रंगली होती. सोडतीमुळे जो तो मातब्बरांसह नवोदितांचा कसा फायदा आणि कसा तोटा झाला, याचे गणित मांडत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात थांबते. कानोसा घेऊन मार्गस्थ होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंत्रालयात असले, तरी त्यांच्या गोटातही निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, गेल्यावेळी नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढलेला भाजप सध्या दोन्ही राजेंच्या निर्णयावर विसंबून असला, तरी येत्या दोन-तीन दिवसांत पक्षीय पातळीवर होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यादृष्टीने स्थानिकांची वाटचाल राहणार आहे.
सातारा नगरपालिकेची २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्या वेळी नगरपालिकेचे ४० नगरसेवक होते. शहराची हद्दवाढ झाल्याने आता आगामी निवडणूक ५० नगरसेवकपदांसाठीची असणार आहे. त्यासाठी २५ प्रभाग आहेत.
पूर्वीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने (साविआ) २२, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास आघाडीने (नविआ) १२, तसेच भाजपने सहा जागांवर यश मिळविले होते, तसेच नगराध्यक्षपद साविआकडे होते.
आरक्षण सोडतीनंतर साविआ आणि नविआ या दोन्ही गटांतील आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते राजकीय चर्चेत गुंतले होते. आरक्षण सोडतीचा सर्वाधिक तोटा साविआला झाल्याची चर्चा आहे. नविआतील मातब्बरांसह नवोदितांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर भाजपची सध्या तरी कोंडी झाली आहे.
गेल्या वेळी सहा उमेदवार निवडून आलेल्या भाजपमधील चार सदस्य एकाच प्रभागातून निवडणूक लढवू इच्छितात. त्यातच दोन्ही आघाडीमधील कार्यकर्तेही इच्छुक असल्याने भाजपची भूमिका तूर्तास ‘वेट ॲण्ड वॉच’ अशीच असणार आहे.
सातारा विकास आघाडी नव्या चेहऱ्याच्या शोधात
प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीनंतर गेल्या वेळी पालिकेत असलेल्या सदस्यांपैकी सातारा विकास आघाडीला सुमारे १५ नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. नगरविकास आघाडीमधील विद्यमान दिग्गजांचे मार्ग सुकर झाले असले, तरी नविआलाही सहा नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. भाजपलाही एक-दोन ठिकाणी भाकरी फिरवावी लागणार आहे.
विविध पक्षांकडून चाचपणी
नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याही पक्षातील कार्यकर्ता उमेदवार असला पाहिजे, यासाठी शिवसेना, आरपीआय, मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदींचे शहराध्यक्ष चाचपणी करत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकांचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.