
शब्द देऊनही पुनर्वसन होत नसल्याने निष्ठावंत बळीराम साठेंचा राष्ट्रवादीला रामराम…
खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊनही पक्षात सन्मानाची वागणूक (जिल्हाध्यक्षपद) मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्षपद देण्याचा शब्द देऊन पाच महिने झाले तरी तो पूर्ण करण्यात आला नाही. उलट साठे यांना दूर ठेवत तालुकाध्यक्ष जाहीर करण्यात आले, त्यामुळे बळीराम साठे यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी येत्या रविवारी (ता. १२ ऑक्टोबर) समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत पुढील राजकीय निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे साठेंच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अडचणीच्या काळात शरद पवार यांना साथ देणारे बळीराम साठे यांची जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे संतापलेले बळीराम साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्व बडे नेते पक्ष सोडून गेलेले असताना बळीराम साठे हे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. पक्षाच्या पडत्या काळात साठे यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्याचे चीज होण्याच्या ऐवजी कोणतीही चर्चा न करता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करण्यात आली होती.
जिल्हाध्यक्षपदावरून दूर करताच बळीराम साठे यांनी इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संजय पाटील घाटणेकर यांच्या मध्यस्थीनंतर शरद पवार यांनी त्यांना थांबविले होते. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत बळीराम साठे यांचा सहभाग असेल. सोलापूर जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करून पूर्व जिल्ह्याची जबाबदारी साठे यांच्याकडे असेल, असे त्यावेळी खुद्द पवारांनी संकेत दिले होते. त्याला पाच महिन्यांचा कालावधी लोटला,पण तो निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील निर्णयप्रक्रियेत साठे यांचा सहभाग असेल, असे शरद पवार यांनी भेटीदरम्यान सांगितले होते. मात्र, त्यांना अंधारात ठेवून जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी उत्तर सोलापूर वगळता जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चिडलेल्या साठेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या संमतीनंतर तालुकाध्यक्षांच्या निवडी :वसंतराव देशमुख
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी ह्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मंजुरीनंतर झाल्या आहेत, असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. साठे समर्थकांची येत्या रविवारी वडाळा येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कुठल्या पक्षात प्रवेश करायचा या निर्णय होणार आहे.
पक्ष सोडणार हे अंतिम : बळीराम साठे
विद्यमान जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी तालुकाध्यक्ष निवडले आहेत. याबाबत आम्हाला कोणीही विश्वासात घेतले नाही, आमच्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले नाही, त्यामुळे आता पक्ष सोडण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरला नाही. नवीन पक्षाबाबत रविवारी कार्यकर्ते निर्णय घेतील. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थांबणार नसल्याचे बळीराम साठे यांनी हा निर्णय जाहीर कताना स्पष्ट केले.