
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…
सध्याच्या काळात ‘रोड फॅक्टरी’ची गरज आहे. त्यामुळे रस्त्यांची निर्मिती स्थायी फॅक्टरीतच होऊन ते नंतर तेथून ते वाहतूकीद्वारे आणून संबंधित रस्त्यांवर टाकले जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजीनियरिंग’ या विषयावरील दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स एमएसईचे अध्यक्ष ए. डब्ल्यू जवंजाळ तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘सध्याच्या काळात ‘रोड फॅक्टरी’ची गरज असून ‘प्री-कास्ट’ मटेरियलच्या असेंबलींगच्या सहाय्याने आता रोड आणि इमारतींचे निर्माण आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्री कास्ट टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यास ते उद्योगाला फायदेशीर ठरेल.
उड्डाणपुलामध्ये स्टील फायबरच्या उपयोगामुळे दोन पीअर मधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात देखील कपात झाली आहे. वणी- वरोरा-जाम येथे बांबूचे क्रॅश बॅरियर्स लावल्यामुळे सुद्धा खर्च वाचला आहे. बायो बिटुमीनच्या सहाय्याने मनसर येथे एक किलोमीटर लांबीचा रस्ता देखील नुकताच बनवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या शाश्वत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तसेच पर्यावरण पूरक आणि भविष्यातील दृष्टिकोन ठेवून बांधकाम केल्यास अपघाताच्या घटना कमी होईल, असेही नितीन गडकरी म्हणाले. बांधकाम क्षेत्रातील व्यावहारिक समस्या समजून घेण्याची गरज आहे. त्याचवेळी पर्यायी बांधकाम सामग्रीच्या सहाय्याने निर्माण खर्च कमी करण्यावर भर द्यायला हवा. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता बांधकाम क्षेत्रातील अभियंता तसेच हितधारक यांनी पर्यावरण पूरक आणि शाश्वत असे बांधकाम करावे, असेही गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांना ‘लाइफटाईम फेलोशीप’ !
समारंभात नितीन गडकरी यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. कृतज्ञता, आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ही ‘लाइफटाइम फेलोशिप’ प्रदान करण्यात आली. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या १०५ वर्षांच्या इतिहासात, या फेलोशिपचा मान पटकाविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी १२ वे दिग्गज आहेत.
भारतीय नागरिक चांगले ॲथलेटिक्स
नितीन गडकरी म्हणाले, भारतीय नागरिक चांगले ॲथलेटिक्स आहेत. रस्त्याच्या वा पुलाच्या मधातून थोडीही जागा दिसल्यास त्यावरून ते शिताफीने उडी मारतात. नागपुरातील वर्धा रोडवरील उदाहरन देत त्यांनी येथेही लोखंडी ग्रील लावण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांनी दोन ग्रीलच्या मधात थोडे अंतर ठेवले. त्यावर संबंधिताला मी तेथून कुणी जाणार नाही काय? हा प्रश्न केला. त्यानंतर दुरूस्ती केली गेली. त्यामुळे प्रत्यक्षात डोके लावून काम करण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.