
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या, की स्वबळावर, याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ‘महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा भाजपचा प्रयत्न असून, युती होण्यास अडचण येणाऱ्या ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढविल्या जाणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात शुभारंभ लॉन्स येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतील पक्षाचे खासदार, आमदार, अध्यक्ष यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यात येत आहेत. भाजपसाठी सकारात्मक परिस्थिती आहे. निवडणूक लढविताना शक्य तेथे महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुतीमधून निवडणूक लढवायची, की स्वबळावर, याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, स्वबळावर निवडणूक लढवितानाही मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
‘काही शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदत’
‘मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मदतीचे वाटप करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. दिवाळीपूर्वी मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कदाचित काही जणांना दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरदेखील मदत मिळेल,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘प्रबळ’ पदाधिकाऱ्याला प्रवेश खुला
‘भाजपमध्ये येण्यासाठी अनेकांची तयारी आहे. अन्य पक्षांतून कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे. बाहेरून चांगला कार्यकर्ता पक्षात येत असेल, तर भाजपचे कार्यकर्ते त्याला समजून आणि सामावून घेतात. यामुळेच भाजप मोठा झाला आहे. एखाद्या ठिकाणी नाराजी येते; पण त्या वेळी आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते समजून घेतात,’ असेही मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.